निसर्ग परिचय केंद्र दुरवस्थेत
By admin | Published: November 8, 2014 01:18 AM2014-11-08T01:18:21+5:302014-11-08T01:18:21+5:30
चपराळा अभयारण्यातील हनुमान मंदिर प्रशांतधाम येथे वनविभागाच्यावतीने १९९६ मध्ये निसर्ग परिचय केंद्र बांधण्यात आले.
आष्टी : चपराळा अभयारण्यातील हनुमान मंदिर प्रशांतधाम येथे वनविभागाच्यावतीने १९९६ मध्ये निसर्ग परिचय केंद्र बांधण्यात आले. मात्र वनविभागाच्या दुर्लक्षामुळे सदर निसर्ग परिचय केंद्राची दुरवस्था झाली आहे. या परिचय केंद्राचा विस्तार करून त्या ठिकाणी सेमाना देवस्थानाच्या धर्तीवर विकास करावा, अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे.
चपराळा येथे दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी विविध भागातून येतात. अभयारण्यातील प्राणी, पक्षी यांची माहिती देणारे विविध कक्ष स्थापन करण्यात यावे, लहान मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारचे झुले, घसरगुंडी आदी साहित्य लावण्यात यावे, चपराळा येथे वर्षभर असंख्य भाविक दर्शनासाठी तसेच शाळांच्या सहलीच्या माध्यमातून विद्यार्थी येतात. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विशेष सुविधा निर्माण कराव्या, अशी मागणी भाविकांकडून होत आहे. चपराळा गावाजवळ वैनगंगा-वर्धा नदीचा संगम आहे. पुढे या नद्या प्राणहिता या नावाने ओळखल्या जातात. या ठिकाणीच हनुमान मंदिर प्रशांतधाम प्रेक्षणीय स्थळ आहे. या ठिकाणी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते.
जिल्हा प्रशासनाने मार्र्कं डा ते चपराळा अभयारण्यापर्यंत वैनगंगा नदीतून जलपर्यटन प्रायोगिक तत्वावर सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याबरोबरच आष्टी येथील बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावरील विश्रामगृहाला रिसॉर्ट बनविण्याचा विचारही शासनाने केला होता. त्यामुळे मार्र्कं डा ते चपराळा येथे येणाऱ्या पर्यटकांची जेवणाची व राहण्याची व्यवस्था होऊ शकली असती. परंतु सदर कामांना अद्यापही सुरूवात करण्यात आली नाही. लहान मुलांसाठी विविध प्रकारचे खेळणी साहित्य निर्माण केल्यास या भागातील पर्यटनाला वाव मिळेल. (वार्ताहर)
वनमंत्री चपराळाच्या विकासाकडे लक्ष देणार काय?
चपराळा या अभयारण्याचा पाहिजे तसा विकास झाला नाही. विकासापासून चपराळा अभयारण्य अनेक दिवसांपासून वंचित आहे. राज्यात भाजपप्रणीत सरकार सत्तेत आल्यामुळे नवीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून चपराळा येथील नागरिकांना विकासाची आस आहे. जिल्ह्यात भामरागड व चपराळा हे दोन अभयारण्य आहेत. मात्र दोनही अभयारण्याच्या विकासाकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर जिल्ह्यातील असल्याने चपराळा अभयारण्याच्या विकासाला गती मिळण्यासाठी ते प्रयत्न करणार काय, अशी अपेक्षा नागरिकांना आहे. गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेलगत मुलचेरा व चामोर्शी तालुक्यामध्ये चपराळा अभयारण्याचे क्षेत्र पसरले आहे. अभयारण्यात साग, चंदन, बेहडा, येन, पळस, गराडी, खैर, अंजन आदी मौल्यवान वृक्ष आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत चपराळा अभयारण्य २५ फेब्रुवारी १९८६ ला घोषित करण्यात आला. सदर अभयारण्याचे नाव चपराळा या गावावरून ठेवण्यात आले. अभयारण्याची सीमा आष्टी येथील वनविभागाच्या चौकीपासून लगाम नाक्यापर्यंत व नागुलवाही गावापासून रेंगेवाहीपर्यंत एकूण १३४.७८ चौ. किमीपर्यंत पसरली आहे. अभयारण्यात चौडमपल्ली, चपराळा, सिंगनपल्ली, धन्नूर, चंदनखेडी, मार्र्कं डा (क) आदी सहा गावे समाविष्ट आहेत. तसेच २१ गाव अभयारण्याच्या अगदी लगतच्या जंगलात आहेत. वनोपजावरच परिसरातील नागरिकांची उपजीविका अवलंबून आहे. वनविभागाच्या कठोर कायद्यामुळे या परिसरातील नागरिकांचा विकास झाला नाही. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य आदी समस्या कायम आहेत. त्यामुळे नवीन वनमंत्र्यांकडून या भागाच्या विकासाची अपेक्षा नागरिकांना आहे.