नवोदयची प्रवेश परीक्षा तीन तास उशीरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:25 AM2018-05-20T00:25:03+5:302018-05-20T00:25:03+5:30

जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता नववीची प्रवेश परीक्षा १९ मे रोजी शनिवारला विविध केंद्रांवर सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत नियोजित केली होती. घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयातही या परीक्षेचे केंद्र होते.

Navodaya's admission test is three hours late | नवोदयची प्रवेश परीक्षा तीन तास उशीरा

नवोदयची प्रवेश परीक्षा तीन तास उशीरा

googlenewsNext
ठळक मुद्देपालकांसह विद्यार्थी संतप्त : नियोजनाचा अभाव, ई-मेलद्वारा प्राप्त प्रश्नपत्रिकेच्या काढल्या झेरॉक्स

लोकमत न्यूज नेटवर्क
घोट : जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता नववीची प्रवेश परीक्षा १९ मे रोजी शनिवारला विविध केंद्रांवर सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत नियोजित केली होती. घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयातही या परीक्षेचे केंद्र होते. मात्र पेपरची वेळ झाली तरी येथे प्रश्नपत्रिकाच उपलब्ध न झाल्याने तब्बल तीन तास विलंबाने सदर प्रवेश परीक्षा सुरू झाली. परिणामी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना केंद्र परिसरात ताटकळत राहावे लागले. या प्रकारामुळे प्रशासनाच्या विरोधात चांगलाच संताप व्यक्त झाला.
या परीक्षेसाठी जिल्ह्याच्या विविध भागातून व ठिकाणावरून घोट येथील केंद्रावर अनेक विद्यार्थी सकाळपासूनच हजर झाले. सदर परीक्षेचा पेपर सकाळी असल्याने कित्येक विद्यार्थी उपाशी पोटी परीक्षा केंद्रावर पोहोचले. नियोजित वेळ होऊनही सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका येथे उपलब्ध न झाल्यामुळे परीक्षेला उशीर होत असल्याचे बघून पालक संतप्त झाले. त्यानंतर निर्धारीत वेळेच्या तीन तास उशीरा म्हणजे, दुपारी १ ते ३.३० या वेळेत परीक्षा घेण्यात आली. यापूर्वी जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेबाबत असा प्रकार घडला नाही. वरिष्ठ पातळीवरून नियोजन ढासळल्याने प्रवेश परीक्षा उशीरा सुरू झाली. यामुळे विद्यार्थी व पालकांना मनस्ताप सहन करावा लागला.

जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता नववीच्या प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका नवोदय विद्यालय क्षेत्रीय कार्यालय प्रमुख पुणे येथून बँक आॅफ महाराष्टÑ शाखा घोटच्या कस्टडीच्या माध्यमातून दरवर्षी उपलब्ध होते. मात्र यावर्षी बँकेत अनेक वेळा चौकशी करूनही वेळेत प्रश्नपत्रिका उपलब्ध झाली नाही. त्यामुळे तीन दिवसांपासून दिल्ली व पुणे येथे ई-मेल व भ्रमणध्वनीद्वारे याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर दिल्ली येथून ई-मेलद्वारे शनिवारी सकाळी ७ वाजता प्रश्नपत्रिका पाठविण्यात आली. मात्र तांत्रिक कारणाने ई-मेल ओपन होत नसल्याने तशी सूचना दिल्ली व पुणे येथे देण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ स्तरावरील सूचनेनुसार नजीकच्या जवाहर नवोदय विद्यालयातून प्रश्नपत्रिका ई-मेलद्वारा मिळवून त्याच्या झेरॉक्स काढून परीक्षा घेण्याची सूचना मिळाली. त्यानंतर वाशिमच्या विद्यालयातून सकाळी १० वाजता ई-मेलने प्रश्नपत्रिका उपलब्ध झाली. सदर प्रश्नपत्रिका २० पानांची असल्याने झेरॉक्स काढण्यात वेळ गेला. परिणामी परीक्षेस तीन तास विलंब झाला.
- जी. कोटय्या, प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय घोट

Web Title: Navodaya's admission test is three hours late

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा