गडचिरोलीतील कमलापुरात नक्षल्यांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 06:36 PM2020-05-21T18:36:18+5:302020-05-21T18:37:55+5:30
एकेकाळी नक्षलवाद्यांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहेरी तालुक्यातील कमलापूरमध्ये रात्री १.३० वाजताच्या सुमारास नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालत चौकातील दोन खांबांवर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडण्याचा प्रयत्न केला. तसेच दि.२२ ला बंद पाळण्याचे आवाहन करणारे बॅनरही चौकात झळकवले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एकेकाळी नक्षलवाद्यांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहेरी तालुक्यातील कमलापूरमध्ये रात्री १.३० वाजताच्या सुमारास नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालत चौकातील दोन खांबांवर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडण्याचा प्रयत्न केला. तसेच दि.२२ ला बंद पाळण्याचे आवाहन करणारे बॅनरही चौकात झळकवले.
२० ते २२ मेदरम्यान नक्षल्यांनी जिल्ह्यात बंदचे आवाहन केले होते. त्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून काही ठिकाणी धुमाकूळ घातला. धानोरा-राजनांदगाव मार्गावर बुधवारी ४ वाहने जाळल्यानंतर गुरूवारच्या पहाटे कमलापुरात धुमाकूळ घातल्याचे समोर आले. कमलापूरमध्ये नक्षलींच्या हालचाली टिपण्यासाठी दोन खांबांवर प्रत्येकी दोन-दोन असे चार सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. नक्षलवाद्यांनी त्यावर बांबूने प्रहार केला. त्यामुळे त्यांचे थोडे नुकसान होऊन दिशाही बदलली. त्यानंतर चौकात एक कापडी बॅनर बांधून काही पत्रकेही तिथे टाकली. त्यात नक्षली नेता सृजनक्काच्या चकमकीतील मृत्यूचा निषेध म्हणून दि.२२ ला बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले. अहेरी एरिया कमिटी असे बॅनरवर नमूद आहे.
म्हणून नक्षलवादी कॅमेऱ्यात कैद झालेच नाही
दरम्यान रेपनपल्ली उपपोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विश्वास शिंगाडे यांना विचारले असता, नक्षलवाद्यांनी बांबूने प्रहार केल्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दिशा बदलली असून ते खराब झालेले नाही, चालू स्थितीत असल्याचे ते म्हणाले. मात्र रात्री विजा चमकत असल्यामुळे कॅमेरे बिघडू नये म्हणून बंद करून ठेवले होते. त्यामुळे संबंधित नक्षलवादी कॅमेऱ्यात कैद होऊ शकले नाही, असे त्यांनी सांगितले.