नक्षलपीडित कुटुंबियांनी रॅलीतून दिला शांततेचा संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 06:04 PM2017-10-02T18:04:41+5:302017-10-02T18:05:45+5:30
शहरातील मुख्य इंदिरा गांधी चौकात जिल्हयातील ३५० ते ४०० नक्षलपीडित व शहिद कुटुंबीयांनी गांधी जयंतीच्या पर्वावर सोमवारी गडचिरोली शहरात अहिंसा रॅली काढली. नक्षल्यांनी आदिवासींच्या केलेल्या हत्येच्या निषेधार्थ नक्षलवाद मुर्दाबाद च्या घोषणा देत धरणे आंदोलन करुन व रॅली काढून नक्षल्यांकडून होणाऱ्या त्रासाबाबत तसेच पिळवणुकीबाबत तहसीलदाराना निवेदन दिले.
गडचिरोली - शहरातील मुख्य इंदिरा गांधी चौकात जिल्हयातील ३५० ते ४०० नक्षलपीडित व शहिद कुटुंबीयांनी गांधी जयंतीच्या पर्वावर सोमवारी गडचिरोली शहरात अहिंसा रॅली काढली. नक्षल्यांनी आदिवासींच्या केलेल्या हत्येच्या निषेधार्थ नक्षलवाद मुर्दाबाद च्या घोषणा देत धरणे आंदोलन करुन व रॅली काढून नक्षल्यांकडून होणाऱ्या त्रासाबाबत तसेच पिळवणुकीबाबत तहसीलदाराना निवेदन दिले.
देशात एखाद्या व्यक्तीचा खून झाला तर देशभरातील विचारवंत आठवडाभर चर्चा करतात. येथे ४९१ निष्पाप आदिवासी बांधवांचा खुन करुनही तथाकथित विचारवंतांना आमचे दु:ख व अश्रु दिसत नाहीत का? असा खडा सवाल नक्षलपिडीत कुटुंबियांनी निवेदनामध्ये केला आहे. तसेच मानवाधिकार आयोगाला आमचे दु:ख व अश्रु दिसत नाहीत. आमच्या १५ वर्षाच्या मुलामुलींच्या हाती बळजबरी शस्त्र देवून देशविघातक कृत्य करण्यास भाग पाडणाऱ्या या नक्षल विचारवंतांना प्रश्न विचारण्याचे धाडस तथाकथित मानवाधिकार रक्षक का करत नाहीत? असाही सवाल नक्षलपिडीत कुटुंबियांनी केला आहे.
नक्षल्यांनी आतापर्यंत अनेक शाळा पाडल्या, मुलांचे शिक्षण रोखले. शासनाच्या महाराष्ट् दर्शन सहलीच्या माध्यमातुन राज्यातील इतर जिल्हयांची झालेली प्रगती पाहणाऱ्या आमच्या मुलांनी सहलीला जावू नये म्हणून धमकावणारे नक्षलवादी हे स्वत:च्या मुलांना मात्र मोठया विद्यापिठात शिकवत आहेत ही वस्तुस्थिती त्यांनी मांडली. तसेच नक्षलवादी हे गोरगरीब आदिवासींच्या मजुरीचा पैसा खंडणी म्हणून गोळा करतात व वाळू, खनिज, रिअल इस्टेट मध्ये स्वत:च्या फायद्यासाठी गुंतवतात ही वास्तव व विदारक परिस्थितीही सर्व कुटुंबीयांनी मांडली.
याचबरोबर जिल्हयात अौद्योगिक प्रकल्प व दळणवळण सुविधा उभारून आदिवासी बांधवांचा खऱ्या अर्थाने विकास करावा, अशी मागणी देखील यावेळी नक्षलपीडित कुटुंबीयांनी प्रशासनाकडे केली.