नक्षली ब्लास्टच्या घटना शून्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2017 01:40 AM2017-04-15T01:40:31+5:302017-04-15T01:40:31+5:30

गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात पोलीस व माओवाद्यात वारंवार चकमकी उडत आहेत;

Naxal blasts incident zero | नक्षली ब्लास्टच्या घटना शून्यावर

नक्षली ब्लास्टच्या घटना शून्यावर

Next

नक्षलग्रस्त भागात अभियान वाढले : २६ महिन्यांत पोलिसांचे यश
गडचिरोली : गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात पोलीस व माओवाद्यात वारंवार चकमकी उडत आहेत; परंतु पोलीस यंत्रणेच्या अभियानात प्रचंड सतर्कता आल्यामुळे गेल्या २६ महिन्यांत नक्षलवाद्यांकडून ब्लास्टची (स्फोटाची) एकही घटना घडलेली नाही. उलट पोलीस प्रशासनाला माओवाद्यांनी लावलेले अनेक भूसुरूंग उद्ध्वस्त करण्यात कमालीचे यश आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात १९८० च्या दशकात माओवादी कारवायांचा उदय झाला. त्यामुळे पोलीस प्रशासनाला या कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध उपाययोजना हाती घ्याव्या लागल्या. माओवाद्यांशी असलेले हे युद्ध जंगलात लढताना पोलिसांना विविध युद्धाचा सामना करावा लागत होता. माओवाद्यांकडून ठिकठिकाणी स्फोटक पेरून भूसुरूंग करण्यात येत होते. २००५ मध्ये ब्लास्टच्या एकूण १० घटना घडल्या. २००६ मध्येही तेवढ्याच घटना झाल्यात. २००७ मध्ये १३ ब्लास्ट झाले तर २००८, २००९ मध्ये प्रत्येकी दोन ब्लास्ट माओवाद्यांकडून करण्यात आले. २०१० मध्ये चार ब्लास्ट झाले तर २०११ मध्ये तीन, २०१२ मध्ये दोन व २०१३, २०१४ मध्ये प्रत्येकी चार-चार भूसुरूंग स्फोट माओवाद्यांनी केलेत. मात्र २०१५, २०१६ तसेच २०१७ च्या २८ फेब्रुवारीपर्यंत एकही ब्लास्ट गडचिरोली जिल्ह्यात झाला नाही. यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे जिल्ह्यात पोलीस ठाण्यांची संख्या वाढल्याने प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत सी-६० पथक निर्माण करण्यात आले. त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर दिवसा व रात्री गस्ती वाढल्या.
नेटवर्कचे जाळे मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नक्षलवाद्यांच्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांची करडी नजर राहू लागली. पोलिसांच्या खबऱ्यांचे नेटवर्क मजबूत झाले. त्यामुळे ब्लास्टच्या बाबतही गुप्त माहिती पोलिसांपर्यंत तत्काळ उपलब्ध होऊ लागली. या साऱ्या बाबी माओवाद्यांसाठी डोकेदुखी ठरल्या. त्यामुळे मागील २६ महिन्यांत नक्षली ब्लास्टची एकही घटना घडलेली नाही. (जिल्हा प्रतिनिधी)

 

Web Title: Naxal blasts incident zero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.