गडचिरोलीतील ‘त्या’ चकमकीत नक्षल उपकमांडरही ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 04:25 PM2020-07-28T16:25:22+5:302020-07-28T16:25:51+5:30
एटापल्ली तालुक्यातील येलदडमी जंगल परिसरात गेल्या ३ जुलै रोजी झालेल्या चकमकीत गट्टा दलमचा डेप्युटी कमांडर अमोल होयामी (२१) हा सुद्धा ठार झाल्याचा दावा पोलीस विभागाने केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील येलदडमी जंगल परिसरात गेल्या ३ जुलै रोजी झालेल्या चकमकीत पेरमिली दलम कमांडर सोमा उर्फ शंकर हा ठार झाल्याचे दुसऱ्या दिवशी स्पष्ट झाले होते. त्यासोबतच आता त्या चकमकीत गट्टा दलमचा डेप्युटी कमांडर अमोल होयामी (२१) हा सुद्धा ठार झाल्याचा दावा पोलीस विभागाने केला आहे.
अमोल होयामी याच्यावर विविध पोलीस ठाण्यात ३ गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यावर शासनाने ६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तो छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातल्या भैरामगड तालुक्यातील रहिवासी होता. २०१७ मध्ये तो भामरागड दलममध्ये दाखल झाला होता. त्यानंतर तो गट्टा दलमच्या डेप्युटी कमांडरपदी कार्यरत होता.
दि.३ जुलैच्या सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास पोलीस आणि नक्षलवाद्यांची चकमक उडाली होती. त्यानंतरच्या शोधमोहीमेत पोलिसांच्या गोळीने ठार झालेल्या नक्षल कमांडर सोमा उर्फ शंकरच्या मृतदेहासह एक बंदूक, २० पिट्टू तसेच मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य पोलिसांच्या हाती लागले होते.
दरम्यान मंगळवार (दि.२८) पासून सुरू झालेल्या नक्षल्यांच्या शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षलविरोधी अभियान तीव्र करत पोलिसांनी गस्त वाढविली. त्यात पोलिसांच्या हाती जे नक्षल साहित्य लागले त्यावरून उपकमांडर अमोल होयामी हासुद्धा ठार झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.