‘त्या’ नक्षल चकमकी बनावट? सत्यशोधन समितीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2018 08:49 PM2018-05-07T20:49:14+5:302018-05-07T20:49:14+5:30

गेल्या २२ एप्रिल रोजी भामरागड तालुक्यातील कसनासूर जंगलात तसेच २३ एप्रिल रोजी अहेरी तालुक्यातील राजाराम परिसरात झालेल्या चकमकी बनावट असल्याचा आरोप करीत पोलिसांनी मृतकांची सामूहिक हत्या केली.

'That' Naxal encounter texture? The allegations of Satyashodhan Samiti are alleged | ‘त्या’ नक्षल चकमकी बनावट? सत्यशोधन समितीचा आरोप

‘त्या’ नक्षल चकमकी बनावट? सत्यशोधन समितीचा आरोप

Next

गडचिरोली : गेल्या २२ एप्रिल रोजी भामरागड तालुक्यातील कसनासूर जंगलात तसेच २३ एप्रिल रोजी अहेरी तालुक्यातील राजाराम परिसरात झालेल्या चकमकी बनावट असल्याचा आरोप करीत पोलिसांनी मृतकांची सामूहिक हत्या केली, असा आरोप सत्यशोधन समितीच्या सदस्यांनी गडचिरोली येथे पत्रकार परिषदेत सोमवारी दिनांक ७ मे रोजी केला आहे.

सत्यशोधन समितीमध्ये  मानवाधिकार संदर्भात काम करणाऱ्या विविध संघटनाच्या ४४ सदस्यांचा समावेश होता. त्यांनी दोन दिवस गडचिरोली जिल्ह्यात फिरून या चकमकी संदर्भातील सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. त्यात कसनासूर जंगलात चकमक घडलीच नाही. तर पोलिसांनी मृतकांना चारही बाजुने घेरून त्यांच्यावर हॅन्ड ग्रेनेड व लॉन्चर फेकले. त्याचबरोबर चारही बाजुने फायरींग झाली. मृतकांनी मात्र फायरींग केली नाही. त्यामुळे याला चकमक म्हणणे चुकीचे असून ही एक प्रकारची सामुहिक हत्या आहे, असा आरोप समिती सदस्यांनी केला. जे लोक मारले गेले, त्यामध्ये काही गावकऱ्यांचासुध्दा समावेश आहे. पोलिसांनीसुध्दा त्यांना बेपत्ता दाखविले आहे. २२ एप्रिलच्या चकमकीत नक्षल कमांडर नंदू व त्याच्या इतर सहा साथीदारांना पोलिसांनी जिवंत पकडले व नंदूकडून नक्षल्यांनी राजाराम जंगलात साठवून ठेवलेला पैसा शोधून काढल्यानंतर त्याच्यावर व इतर साथीदारांवर गोळ्या झाडल्याचे समितीचे सदस्य म्हणाले. ४० मृतदेहांपैकी केवळ दोघांच्या शरीरात बंदुकीच्या गोळ्या आढळल्याचे डॉक्टरांनी समिती सदस्यांना सांगितल्याचे ते म्हणाले. बोरीया गावातील नागरिक पोलिसांच्या प्रचंड दबावात आहेत. त्यामुळे ते बोलण्यास तयार नसल्याचे सांगितले. सदर चकमक बनावट असून पोलिसांनी संबंधिताची निघृण हत्या केली आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह संबंधित पोलिसांवर भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करावा. या प्रकरणाची न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे, अशी माहिती समिती सदस्यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पत्रकार परिषदेला आशिष गुप्ता, एन. नारायणराव, व्ही. रघुनाथ, क्रांती चैतन्य, एन. गंगाधर, डॉ. महेश कोपुलवार, अमोल मारकवार, जि.प. सदस्य अ‍ॅड. लालसू नागोटी यांच्यासह सर्वच सदस्य उपस्थित होते.
या आरोपांसंदर्भात पोलीस उपमहानिरिक्षक अंकूश शिंदे यांच्याशी संपर्क केला असता, हे आरोप बिनबुडाचे असून सत्यावर आधारीत नसल्याचे सांगितले. मृत नक्षल्यांच्या शरीरात बंदुकीच्या गोळ्या आढळल्या असून तसा शवविच्छेदन अहवालही असल्याचे सांगितले.

नक्षल पीडितांची नारेबाजी
सत्यशोधन समितीचे सदस्य भामरागड तालुक्यातील बोरीया या गावात गेले असता, नक्षल पीडित कुटुंबांनी या सत्यशोधन समितीचा निषेध केला. मागण्यांचे निवेदन सुध्दा सत्यशोधन समितीला सादर केले. नक्षल्यांकडून अनेक नि:ष्पाप नागरिकांची हत्या केली जाते. त्यावेळी सत्य शोधण्याचा प्रयत्न या समितीकडून का केला जात नाही, असा प्रश्न नक्षल पीडित नागरिकांनी उपस्थित केला.

या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यामुळे जे सत्य आहे ते समोर येईलच. त्यानुसार कारवाई केली जाईल. सोबतच एनएचआरसीला रिपोर्ट पाठविल्या जाईल.
- डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक, गडचिरोली

Web Title: 'That' Naxal encounter texture? The allegations of Satyashodhan Samiti are alleged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.