नक्षलग्रस्त मुत्तापूर गाव नागपूर विभागात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 10:10 PM2017-09-23T22:10:45+5:302017-09-23T22:11:08+5:30
केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत जलसंधारणाची अनेक कामे केली जात आहेत. सन २०१५-१६ या वर्षात सदर अभियानात उत्कृष्ट काम करणाºया अहेरी पंचायत समितीमधील महागाव ग्रामपंचायतीतील मुत्तापूर गावाने नागपूर विभागात अव्वल स्थान प्राप्त केला आहे. याशिवाय धानोरा तालुक्यातील जप्पी गावाला जलयुक्त शिवारच्या कामात पाचवे स्थान मिळाले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन क्षेत्र वाढवून टंचाईमुक्त महाराष्टÑ घडविण्यासाठी सन २०१५ पासून गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात जलयुक्त शिवार अभियान ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १५३ गावांची आराखड्यात निवड करण्यात आली. या गावांमध्ये कोट्यवधी रूपयांची जलसंधारणाची विविध कामे मंजूर करण्यात आली. तीन हजार पेक्षा अधिक कामे करणाºया पाच गावांची निवड सन २०१५-१६ पुरस्कारासाठी प्रशासनामार्फत करण्यात आली. यामध्ये अहेरी तालुक्यातील मुत्तापूर, धानोरा तालुक्यातील जप्पी, भामरागड तालुक्यातील कोठी, एटापल्ली तालुक्यातील वासामुंडी व गुरूपल्ली आदी गावांचा समावेश आहे. या पाच गावात झालेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला. तपासणीनंतर पुरस्कार समितीपुढे हे प्रस्ताव समितीने मुत्तापूर गावाची निवड प्रथम पुरस्कारासाठी केली. तसेच जप्पी गावाला जलयुक्त शिवारच्या कामात पाचवा क्रमांक दिला आहे.
३२ हजार घ.मी. जलसंचय
महागाव ग्रा.पं. अंतर्गत मुत्तापूर / दिनचेरपल्ली हे गाव आलापल्ली-चंद्रपूर मार्गावर वसले आहे. येथील लोकसंख्या ३४७ असून जवळपास १३५ हेक्टर शेतजमीन आहे. येथे १५ तलाव, चार बोड्यांचे नविनीकरण असे एकूण २२ कामांचे नियोजन करण्यात आले. या कामातून ३२ हजार ९४० घन मीटर जलसंचय अपेक्षीत आहे.