नक्षल कारवाया रोखणार ‘कोब्रा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 11:01 PM2017-11-28T23:01:09+5:302017-11-28T23:02:42+5:30
गेल्या आठवड्यात सतत झालेल्या नक्षली कारवाया आणि येत्या २ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांच्या घातपाती कारवाया रोखण्यासाठी पोलीस दल सज्ज होत आहेत.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : गेल्या आठवड्यात सतत झालेल्या नक्षली कारवाया आणि येत्या २ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांच्या घातपाती कारवाया रोखण्यासाठी पोलीस दल सज्ज होत आहेत. नक्षलवाद्यांशी दोन हात करण्यात पटाईत असलेल्या ‘कोब्रा’ बटालियनच्या जवानांना मंगळवारी छत्तीसगडमधील जगदलपूरवरून गडचिरोलीत आणण्यात आले.
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) हेलिकॉप्टरने दिवसभर कोब्रा बटालियनच्या जवानांना गडचिरोलीत आणणे सुरू होते. गडचिरोली जिल्ह्याच्या छत्तीसगड सीमेवरील कोरची आणि धानोरा तालुक्यातील छत्तीसगड सीमेवर त्यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात नक्षलवाद्यांनी छत्तीसगड सीमेवर केलेल्या हिंसक कारवायांमध्ये ३ नागरिकांची हत्या केली. याशिवाय भूसुरुंग स्फोट आणि चकमकीत जिल्हा पोलीस दलातील एक हवालदार व सीआरपीएफच्या एका जवानाला शहीद व्हावे लागले.
येत्या २ ते ८ डिसेंबरदरम्यान नक्षल्यांकडून पीएलजीए (पिपल्स लिबरेशन गोरिल्ला आर्मी) सप्ताह पाळला जातो. यादरम्यान हिंसक कारवाया वाढण्याची शक्यता पाहता पोलीस यंत्रणा वेळीच तयारीला लागली आहे. यापूर्वी २८ जुलै ते ४ आॅगस्टदरम्यान नक्षल्यांनी पाळलेल्या शहीद सप्ताहादरम्यान कोणत्याही नक्षली कारवाया यशस्वी झाल्या नव्हत्या. मात्र गेल्या आठवडाभरातील स्थिती पाहता पोलीस अधिक सतर्क झाले आहेत.
विशेष म्हणजे गेल्या ११ महिन्यात जिल्ह्यात पोलीस चकमकीत ९ नक्षलवादी मारले गेले आहेत. ज्या भागात पोलिसांच्या चकमकी झाल्या त्या भागातील नागरिकांना नक्षलवादी आपल्या हिटलिस्टवर आणत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्या भागात पोलिसांनाही आपले आॅपरेशन अधिक प्रभावीपणे राबविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची गडचिरोलीत बैठक
नक्षल अभियानचे अतिरिक्त पोलीस महासंचालक डी.कनकरत्नम, विशेष पोलीस महानिरीक्षक शरद शेलार, उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्यासह सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सोमवारी गडचिरोलीत दाखल होऊन संयुक्त बैठक घेतली. यात पीएलजीए सप्ताहात नक्षल्यांच्या घातपाती कारवाया रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या याची रणनिती ठरविण्यात आली.
अविश्वासाच्या भावनेतून निष्पाप गावकऱ्यांची हत्या
पूर्वी गावातील एखाद्या व्यक्तीला मारण्यापूर्वी नक्षलवादी त्या गावातील लोकांपुढे जनसुनावणी घेऊन त्याने कोणता गुन्हा केला ते सांगत होते. त्यात त्या व्यक्तीला आपले म्हणणे मांडण्याची संधी देत होते. शेवटी त्यांना जे करायचे तेच करीत असले तरी जनसुनावणीमुळे नागरिकांना त्याच्याबद्दलची माहिती कळत होती. पण आता नक्षल्यांमध्ये गावकऱ्यांबद्दल अविश्वासाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे जनसुनावणी वगैरे न घेता थेट गावकऱ्यांना मारले जात आहे. मात्र पोलीस खबरे असल्याचे सांगत ज्यांची हत्या केली ते बहुतांश लोक पोलिसांचे खबरे नव्हतेच. त्यांनी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा नक्षल्यांनी त्यांना दिली, असे पोलीस अधीक्षक डॉ.देशमुख यांनी सांगितले.
‘तो’ भूसुरूंग २ ते ३ आठवड्यांपूर्वी लावलेला
२४ नोव्हेंबरला कोरची तालुक्यातील कोटगुलच्या बाजाराजवळील रपट्यावर नक्षल्यांनी पेरून ठेवलेला भूसुरूंग २ ते ३ आठवड्यापूर्वी लावलेला होता. साधारणत: असे भूसुरूंग रस्त्यावर किंवा नक्षलविरोधी अभियान राबविण्याच्या क्षेत्रात घडवून आणले जातात. परंतू यावेळी नक्षल्यांनी प्रथमच गावाच्या बाजारजवळ भूसुरूंग लावला. त्या ठिकाणी बॉम्बशोधक पथकाने तपासणी केली नव्हती. यात बॉम्बशोधक यंत्रावर किंवा पथकाच्या कार्यक्षमतेवर शंका घेण्याचे कारण नाही. मात्र हा खड्डा खोदल्या जात असताना पोलीस यंत्रणेला त्याची माहिती मिळाली नाही, यात आमची यंत्रणा कुठेतरी कमी पडली, असे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.