नक्षल बंदला अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 07:13 PM2018-05-10T19:13:39+5:302018-05-10T19:13:39+5:30
तीन आठवड्यांपूर्वी जिल्ह्यातील कसनासूर-बोरियाच्या जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर नक्षल्यांना मारल्याचा निषेध म्हणून नक्षल्यांच्या वतीने गुरूवारी (दि.१०) गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन केले होते.
गडचिरोली : तीन आठवड्यांपूर्वी जिल्ह्यातील कसनासूर-बोरियाच्या जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर नक्षल्यांना मारल्याचा निषेध म्हणून नक्षल्यांच्या वतीने गुरूवारी (दि.१०) गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन केले होते. मात्र धानोरा, एटापल्ली व कोरची तालुक्यातील काही भाग वगळता बहुतांश ठिकाणी बंदचा प्रभाव जाणवला नाही. त्यामुळे नागरिकांमधील नक्षली दहशत कमी होत असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र दुसरीकडे प्रथमच गडचिरोली शहरालगत नक्षली बॅनर आणि पत्रके आढळल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
धानोरा तालुक्यातील मुरूमगाव ते सावरगाव, कुलभटी ते गजामेढी या मार्गावर काही ठिकाणी रस्ता आडवा खोदून तसेच रस्त्यावर मोठी झाडे कापून टाकली होती. त्यामुळे छत्तीसगडकडे जाणारी वाहतूक सायंकाळपर्यंत पूर्णपणे ठप्प झाली होती. ८ ते १० ठिकाणी झाडे टाकल्याचे आढळून आले. त्यामुळे प्रवासी वाहनांसह मालवाहू वाहनांना चांगलाच फटका बसला. यादरम्यान मुरूमगावजवळ वाहनांची मोठी रांग लागली होती. काही नागरिकांना नक्षली दहशतीत आणि कडक उन्हात पायीच वाट धरावी लागली. जिल्ह्यात इतरही काही ठिकाणी बंद पाळण्याचे आवाहन करणारे नक्षली बॅनर लागले होते.
मुरूमगाव येथे उभ्या असलेल्या काही वाहन चालकांनी सांगितले की, मुरूमगाव-सावरगाव मार्ग पहाटे ३ वाजतापासून बंद आहे. काही वाहन जंगलात तर काही मुरूमगावजवळ उभे होते. वाहनचालकांसह प्रवाशांना खाण्या-पिण्याचे साहित्यही त्या ठिकाणी मिळेनासे झाले होते. मात्र कुलभटी आणि सावरगाव मार्ग बंद असताना दुपारपर्यंत पोलीस किंवा स्थानिक प्रशासनाचे अधिकारी तिथे पोहोचले नव्हते.
एटापल्ली ते गट्टा मार्गावरील बससेवा व खासगी वाहतूक बंद होती. एटापल्ली-जारावंडी व इतर मार्ग मात्र सुरू होते. दुकानेही सुरू होती. अहेरी तालुक्यातील बहुतांश व्यवहार सुरू होते. पण रस्त्यांच्या कामावरील कंत्राटदाराची दुर्गम भागातील कामे बंद होती. कोरची येथील आठवडी बाजार बंदच्या दहशतीत उशिरा सुरू झाला. मात्र बाजारात नेहमीप्रमाणे वर्दळ नव्हती.
बॅनरमधून न्यायालयीन चौकशीची मागणी
गडचिरोली शहरापासून २ किलोमीटरवर असलेल्या पोटेगाव मार्गावरील पुलाजवळ नक्षली बॅनर आणि पत्रके आढळली. यापूर्वी गडचिरोली शहराच्या आसपास कधीही नक्षली बॅनर, पत्रके आढळली नाहीत. त्यामुळे माओवादी आता जिल्हा मुख्यालयापर्यंत पोहोचले की काय, अशी चर्चा सुरू होती. त्या बॅनवर नक्षल चकमकीची न्यायालयीन चौकशी करण्याची आणि पोलिसांच्या सी-६० कमांडोंना कडक सजा द्यावी, अशी मागणी केली होती.