Maharashtra Election 2019; नक्षलवाद नियंत्रणात आणला, पुढील पाच वर्षात पूर्णपणे संपवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 04:17 PM2019-10-18T16:17:27+5:302019-10-18T16:19:29+5:30
गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने नक्षलवाद नियंत्रणात आणला आहे, पुढील पाच वर्षात तो पूर्णपणे संपवू, अशी ग्वाही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येथे जाहीरपणे दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने नक्षलवाद नियंत्रणात आणला आहे, पुढील पाच वर्षात तो पूर्णपणे संपवू, अशी ग्वाही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येथे जाहीरपणे दिली. भाजप उमेदवारांसाठी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.
यावेळी शाह यांनी आपल्या २० मिनिटांच्या भाषणात एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहप्रकल्प लवकरच सुरू होणार असून त्यात ८५ टक्के स्थानिक लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले. मुलचेरा तालुक्यातील चेन्ना प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे, तो प्रकल्प लवकरच सुरू होईल. वैनगंगा नदीवर ठिकठिकाणी बॅरेज बांधून सिंचनाची व्यवस्था केली जाईल. तसेच बल्लारशहा-एटापल्ली रेल्वेमार्ग उभारण्याचे आश्वासनही शाह यांनी आपल्या भाषणात दिले.
जिल्ह्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याला हात घालताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला भाजपने संविधानिक मान्यता दिल्याचे ते म्हणाले. आदिवासी शहीद जवानांसाठी मोठे स्मारक बनविणार असून नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील कॅन्सरच्या रुग्णांना उपचारासाठी मुंबईला जावे लागू नये म्हणून येथेच कॅन्सरच्या उपचाराची सुविधा देण्याचे आश्वासन शाह यांनी दिले.
यावेळी मंचावर खासदार अशोक नेते, भाजपचे विदर्भ संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, आ.रामदास आंबटकर, जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, अहेरीतील उमेदवार आ.अम्ब्रिशराव आत्राम, गडचिरोलीचे उमेदवार आ.डॉ.देवराव होळी, आरमोरीचे उमेदवार आ.कृष्णा गजबे, जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर, अहेरीच्या नगराध्यक्ष वर्षा ठाकरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी काँग्रेसच्या माजी प्रदेश सचिव सगुणा तलांडी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित शहा पहिल्यांदाच नक्षलग्रस्त भागात आल्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त लागला होता. ही सभा निर्विघ्नपणे पार पडल्यामुळे पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
इथेही ‘शरदराव’
अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवारांचा उल्लेख आपल्या भाषणात आवर्जुन केला. शरदराव, तुम्ही ५० वर्षात केले नाही ते आम्ही ५ वर्षात केले, असे सांगत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा भाजपचाच कारभार सरस असल्याचे सांगितले. शाह यांनी तीन वेळा पवारांचे नाव घेतले. त्यामुळे भाजपला स्पर्धक म्हणून काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस जास्त महत्वाची वाटत असावी, अशी चर्चा श्रोत्यांमध्ये उमटत होती.