पाेलिस पाटलाची हत्या करणारा नक्षलवादी जेरबंद

By दिगांबर जवादे | Published: December 10, 2023 09:04 PM2023-12-10T21:04:27+5:302023-12-10T21:06:26+5:30

दीड लाखाचे हाेते बक्षीस : गट्टा पाेलिसांची कारवाई.

naxalite arrested for murdering police constable in gadchiroli | पाेलिस पाटलाची हत्या करणारा नक्षलवादी जेरबंद

पाेलिस पाटलाची हत्या करणारा नक्षलवादी जेरबंद

दिगांबर जवादे, गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील टिटाेला येथील पाेलिस पाटलाच्या हत्येतील प्रमुख आराेपी असलेला तसेच अनेक हिंसक घटनांमध्ये सहभागी असलेल्या नक्षलवाद्याला ९ डिसेंबर राेजी गट्टा (जांभिया) पोलिस जवानांनी सापळा रचून अटक केली आहे. शासनाने त्याच्यावर दीड लाख रुपयांचे बक्षीस ठेवले हाेते.

अर्जुन सम्मा हिचामी (१९, रा. झारेवाडा, ता. एटापल्ली) असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे. २ ते ८ डिसेंबरदरम्यान नक्षलवाद्यांकडून पीएलजीए सप्ताह राबविला जाते. यादरम्यान नक्षलवाद्यांकडून सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिस दलावर हल्ले करून त्यांच्याजवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळा आणून जाळपोळ करणे आदी देशविघातक कृत्य करण्याची शक्यता असते. त्यामुळे या कालावधीत पाेलिस विभाग सतर्क राहतो. दुर्गम भागात नक्षलविराेधी अभियान राबविले जाते.

एटापल्ली तालुक्यातील गट्टा पाेलिस मदत केंद्राचे जवान जंगल परिसरात नक्षलविराेधी अभियान राबवत हाेते. दरम्यान, जहाल नक्षलवादी अर्जुन हिचामी हा पाेलिस पार्ट्यांबाबतची गाेपनीय माहिती देण्याच्या उद्देशाने गट्टा नाल्याजवळ लपून बसला असल्याचे आढळून आले. सापळा रचून पाेलिस जवानांनी त्याला अटक केली.

एटापल्ली तालुक्यातील टिटाेला येथील पाेलिस पाटील लालसू वेळदा यांची २३ नाेव्हेंबर राेजी हत्या झाली हाेती. या हत्येत अर्जुनचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. पाेलिस स्टेशन गट्टा (जां.), हेडरी आणि सुरजागड भागातील सुरक्षा जवानांच्या हालचालींवर तो बारीक लक्ष ठेवून होता. फेब्रवारी महिन्यात विसामुंडी आणि अलेंगा येथील बांधकाम उपकरणांच्या जाळपोळ प्रकरणातही त्याचा सक्रिय सहभाग होता. त्याच्याविराेधात गट्टा पाेलिस स्टेशनमध्ये विविध कलमांन्वये गुन्हे दाखल आहेत. पोलिस पाटलाची हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला तो पहिला आरोपी आहे.

जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकूण ७३ माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिस दलास यश आले आहे. सदर कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. अर्जुन हिचामी हा २०२१ पासून झारेवाडा आणि आजूबाजूच्या भागात जनमिलीशिया सदस्य म्हणून सक्रिय होता. येत्या काही दिवसांत पेरमिली दलममध्ये सदस्य पदावर सामील होण्याची त्याची योजना होती.

Web Title: naxalite arrested for murdering police constable in gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.