गडचिरोलीत जहाल नक्षली दाम्पत्याला अटक तर दोन दलम सदस्य शरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 08:34 PM2020-08-10T20:34:00+5:302020-08-10T20:35:33+5:30
नक्षलवाद्यांच्या टिपागड दलमचा डिव्हीजनल कमिटी मेंबर (डिव्हीसीएम) यशवंत उर्फ दयाराम अंकलू बोगा (३५) आणि त्याची पत्नी टिपागड दलम सदस्य शारदा उर्फ सुमित्रा पितुराम नैताम (३२) यांना सोमवारी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षल चळवळीला मोठा हादरा देत गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या टिपागड दलमचा डिव्हीजनल कमिटी मेंबर (डिव्हीसीएम) यशवंत उर्फ दयाराम अंकलू बोगा (३५) आणि त्याची पत्नी टिपागड दलम सदस्य शारदा उर्फ सुमित्रा पितुराम नैताम (३२) यांना सोमवारी अटक केली. तसेच चातगाव दलम सदस्य जतीन उर्फ भाऊजी तुमरेटी (२४) आणि गट्टा दलमची सदस्य रंजना उर्फ ज्योती दोगे मट्टामी (१८) या दोघांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. या चौघांवर एकूण २७ लाख रुपयांचे बक्षीस शासनाने जाहीर केले होते.
पोलीस उपमहानिरीक्षक महादेव तांबडे आणि पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या भूमिकेचे स्वागत करत त्यांना पांढरा दुपट्टा पांघरला. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोहीतकुमार गर्ग (प्रशासन), अजयकुमार बन्सल (आॅपरेशन), उपअधीक्षक के.सुदर्शन, भाऊसाहेब ढोले उपस्थित होते.
या दोन्ही घटनांची माहिती देताना डीआयजी तांबडे यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेले नक्षली दाम्पत्य हे जहाल नक्षलवादी आहेत. डिव्हीसीएम यशवंत याच्यावर ७८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यात ६ पोलिसांसह १८ खून आणि १० जाळपोळीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. हत्तीगोटा, मरकेगाव यासह गेल्यावर्षी दादापूर येथील वाहनांची जाळपोळ आणि १ मे २०१९ रोजी १५ पोलिसांच्या मृत्यूसह कारणीभूत भूसुरूंग स्फोट घडवून आणण्यातही त्याचा सहभाग होता. याशिवाय ३५ चकमकीतही त्याचा सहभाग होता. त्याच्यावर १६ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. त्याची पत्नी शारदा हिच्यावर ४७ गंभीर गुन्ह्यांची नोंद असून तिच्यावर २ लाखांचे बक्षीस होते. खबरींकडून मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगड सीमेकडील भागात त्यांना अटक करण्यात आली. त्यांना हेलिकॉप्टरने गडचिरोलीत आणण्यात आले. या घटनांमुळे नक्षलवाद्यांना मोठा झटका बसला आहे.
अवघ्या १६ व्या वर्षी चळवळीत दाखल
आत्मसमर्पण केलेली रंजना उर्फ ज्योती दोगे मट्टामी (१८) ही अवघी १६ वर्षाची असताना २०१८ मध्ये गट्टा दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाली होती. एप्रिल २०२० पर्यंत ती तिथे कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे ४ गुन्हे दाखल असून शासनाने तिच्यावर ४ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
४जतीन उर्फ भाऊजी तुमरेटी (२४) हा २०१६ मध्ये म्हणजे वयाच्या विसाव्या वर्षी नक्षल्यांच्या चातगाव दलममध्ये भरती झाला होता. तीन वर्ष तो डिव्हीसी सुकलालचा बॉडीगार्ड म्हणून काम करत होता. त्यानंतर एप्रिल २०२० पासून चातगाव दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होता. त्याच्यावर चकमकीचे १० गुन्हे, खुनाचे २ गुन्हे असून शासनाने त्याच्यावर ४.५० लाखांचे बक्षीस ठेवले होते.
दिड वर्षात ३५ जणांचे आत्मसमर्पण
गडचिरोली पोलीस दलाने गेल्या दोन वर्षात नक्षली नेत्यांच्या आत्मसमर्पण आणि अटकेवर भर दिला आहे. त्यामुळे २०१९-२० या दिड वर्षात ३५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून त्यात ४ डिव्हीजनल कमिटी कमांडर, २ दलम कमांडर, २ दलम उपकमांडर, २६ सदस्य आणि १ जनमिलीशिया (नक्षल समर्थक) यांचा समावेश आहे. या कारवायांमुळे नक्षल चळवळ कमकुवत होत असून सोबत विकास कामेही मार्गी लावण्यास हातभार लागत असल्याचे यावेळी डीआयजी तांबडे आणि एसपी शैलेश बलकवडे यांनी सांगितले.