२० लाखांचे बक्षीस असलेले नक्षली दाम्पत्य गजाआड; तेलंगणा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 10:43 AM2023-08-24T10:43:47+5:302023-08-24T10:47:29+5:30

गडचिरोलीत होती दहशत

Naxalite couple arrested with 20 lakh reward | २० लाखांचे बक्षीस असलेले नक्षली दाम्पत्य गजाआड; तेलंगणा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई

२० लाखांचे बक्षीस असलेले नक्षली दाम्पत्य गजाआड; तेलंगणा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई

googlenewsNext

गडचिरोली : दंडकारण्यासह गडचिरोलीच्या नक्षली चळवळीत दहशत व डोक्यावर २० लाखांचे बक्षीस असलेल्या दाम्पत्याला तेलंगणा पोलिसांनी मध्यप्रदेशच्या जबलपूर येथून अटक केली. कारवाई २२ ऑगस्ट रोजी केली असून, नक्षली चळवळीला हा मोठा धक्का मानला जात आहे.

कुसनन अशोक रेड्डी उर्फ बलदेव आणि कुमारी कोटाई उर्फ रहमती असे त्या दाम्पत्याचे नाव आहे. तेलंगणा पोलिसांनी मध्यप्रदेशातील जबलपूर येथून त्यांना ताब्यात घेतले. दोघांवरही २० लाखांचे बक्षीस होते. यापूर्वी २००५ मध्ये गडचिरोली येथील पुराडा परिसरात केलेल्या हिंसक गुन्ह्यात कुसनन अशोक रेड्डी याला अटक झाली होती. तेलंगणातील उस्मानिया विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलेला कुसनन अशोक रेड्डी सुरुवातीला एका कंपनीत कार्यरत होता. तिथे तो कामगार चळवळीशी जोडला. १९८९ साली नक्षली चळवळीशी संपर्क आल्यानंतर ‘पीपल्स वॉर’मध्ये तो सक्रिय झाला. १९९२ मध्ये अम्प्रो बिस्कीट कंपनीच्या व्यवस्थापकाच्या हत्येप्रकरणी त्याला पहिल्यांदा अटक झाली होती. १९९५ ला जामिनावर सुटल्यानंतर तो दंडकारण्यात गोंदिया जिल्ह्यात पुन्हा सक्रिय झाला.

लग्नानंतर गडचिराेलीत घातपाती कारवाया

२००१ मध्ये लग्नानंतर त्याने गडचिरोली येथे कुरखेडा पुराडा परिसरात विविध हिंसक कारवाया घडवून आणल्या. २००६ साली त्याची नक्षल्यांच्या महाराष्ट्र समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यास पोलिसांनी जेरबंद केले होते. २०१२ मध्ये त्याची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर तो काही दिवस गावात राहिल्यानंतर २०१४ पासून भूमिगत होता. यादरम्यान अशोक दंडकारण्य स्पेशल झोनल समितीत सदस्य म्हणून कार्यरत होता तर त्याची पत्नी रहमती उत्तर बस्तर समितीची सदस्य म्हणून सक्रिय होती.

Web Title: Naxalite couple arrested with 20 lakh reward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.