नक्षल्यांनी जाळली रस्ता बांधकामावरील १६ वाहने
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2018 08:54 PM2018-12-01T20:54:17+5:302018-12-01T21:00:10+5:30
गडचिरोली - नक्षलवाद्यांकडून रविवारपासून पाळल्या जाणा-या पीएलजीए (पिपल्स लिबरेशन गोरिल्ला आर्मी) सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालत ...
गडचिरोली - नक्षलवाद्यांकडून रविवारपासून पाळल्या जाणा-या पीएलजीए (पिपल्स लिबरेशन गोरिल्ला आर्मी) सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालत रस्ता बांधकामावर असलेली १६ वाहने जाळली. रस्ता बांधकामाला तसेच सुरजागड लोहखाणीला विरोध म्हणून हे कृत्य करून कोट्यवधी रुपयांची हाणी करण्यात आली. ही घटना शुक्रवारच्या रात्री घडली.
प्राप्त माहितीनुसार, आलापल्लीपासून ११ किलोमीटरवर असलेल्या वट्टेगट्टा ते गट्टेपल्ली या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत खडीकरणाचे काम एका कंत्राटदार कंपनीकडून सुरू होते. शुक्रवारी हे खडीकरणाचे काम संपणार होते. दरम्यान दुपारी ३.३० च्या सुमारास काही महिला नक्षलींसह ८ ते १० नक्षलवाद्यांनी तिथे येऊन सदर बांधकामावरील मजुरांकडून त्यांच्याकडे असलेले मोबाईल फोन हिसकावून घेतले. त्यानंतर त्या कामाववील १० पोकलॅन, ५ ट्रॅक्टर जेसीबी आणि एक ४०७ मालवाहू वाहन अशी एकूण १६ वाहने रस्त्याच्या कामापासून ३ किलोमीटर लांब रेगडी मार्गावरील जंगलाजवळ नेली आणि त्या वाहनांसाठी टाक्यांमध्ये ठेवलेले डिझेल शिंपडून ती वाहने पेटवून दिली. सायंकाळी ६ पासून रात्री ८ वाजेपर्यंत वाहने पेटविण्याचे काम सुरू होते. त्यामुळे सर्व १६ वाहने पूर्णपणे जळाली.
शनिवारी सकाळपर्यंत या वाहनांमधील आग धुमसत होती. यातील काही वाहने राजस्थान पासिंगची होती तर काही महाराष्टÑाची होती. या वाहनांची एकूण किंमत ४ कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात आले. तत्पूर्वी या नक्षलवाद्यांनी गावात येऊन बैठक घेऊन सदर कामाला विरोध असल्याचे गावकºयांना बजावले. शुक्रवारी सकाळी मजुरांची सुटका झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
नक्षल्यांच्या कंपनी क्रमांक १० चे हे कृत्य असल्याचे कळते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सकाळी अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, एटापल्लीचे एसडीपीओ किरणकुमार सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी हालेवारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमोल काळे हे अधिक तपास करीत आहेत.