नक्षली मंगरू मडावी याला अटक; होते दोन लाखांचे बक्षीस, तीन खुनांसह चकमकीत सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 09:45 PM2021-10-19T21:45:02+5:302021-10-19T21:45:41+5:30
Gadchiroli News अहेरी उपविभागांतर्गत येणाऱ्या पेरमिली उपपोलीस स्टेशनच्या हद्दीतील जंगलातून गडचिरोली पोलिसांच्या विशेष अभियान पथकाने मंगरू कटकू मडावी (३५ वर्षे) या नक्षलवाद्याला अटक केली.
गडचिरोली : अहेरी उपविभागांतर्गत येणाऱ्या पेरमिली उपपोलीस स्टेशनच्या हद्दीतील जंगलातून गडचिरोली पोलिसांच्या विशेष अभियान पथकाने मंगरू कटकू मडावी (३५ वर्षे) या नक्षलवाद्याला अटक केली. त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असून शासनाने दोन लाख रुपयांचे बक्षीसही ठेवले होते, अशी माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली. मंगरू हा भामरागड तालुक्यातील नारगुंडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील विसामुंडी या अतिसंवेदनशील गावातील रहिवासी आहे. तो पेरमिली एलओएसमध्ये सदस्य पदावर भरती होऊन ॲक्शन टिम मेंबर म्हणून तसेच प्रतिबंधित असलेल्या दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटनेचा वरिष्ठ कॅडर म्हणून कार्यरत होता.
याच वर्षी बुर्गी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत उपसरपंच रामा तलांडी यांच्या खुनात, तसेच बुर्गी पोलीस मदत केंद्रावरील हल्ल्यात त्याचा सहभाग होता. त्याच्यावर एकूण ३ खून व १ चकमक असे ४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या नक्षली कारवायांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने त्याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. त्याचा आणखी काही गुन्ह्यात सहभाग आहे का, याचा तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, एएसपी समीर शेख (अभियान), एएसपी अनुज तारे (अहेरी) यांच्या नेतृत्वात पार पाडण्यात आली.
नक्षल चळवळीत स्थानिक युवक-युवती सहभागी होण्याचे प्रमाण थांबले आहे. सध्या जिल्ह्यात कार्यरत नक्षलवाद्यांमध्ये स्थानिक लोकांचे प्रमाण ३५ टक्के आहे. अटक किंवा आत्मसमर्पण केलेल्या नक्षलींच्या जागेवर नवीन लोक घेण्यासाठी त्यांना बाहेरच्या राज्यात नक्षल भरती करावी लागत आहे, यावरून त्यांना जनाधार मिळत नाही, हे स्पष्ट आहे. नक्षलवाद्यांनी हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करावे आणि सन्मानाने जीवन जगावे.
- अंकित गोयल
पोलीस अधीक्षक, गडचिरोली