झेंडेपार लोहाखाणीला नक्षल्यांचा विरोध; प्रवक्ता श्रीनिवासचे पत्रक

By संजय तिपाले | Published: October 26, 2023 02:39 PM2023-10-26T14:39:46+5:302023-10-26T14:41:36+5:30

नक्षलवाद्यांच्या पश्चिम सबझोनल ब्युरो प्रवक्ता श्रीनिवास याच्या नावाने समाज माध्यमावर हे पत्र व्हायरल झाले आहे.

Naxalite opposition to Zendepar iron mine; Leaflet by Spokesperson Srinivas | झेंडेपार लोहाखाणीला नक्षल्यांचा विरोध; प्रवक्ता श्रीनिवासचे पत्रक

झेंडेपार लोहाखाणीला नक्षल्यांचा विरोध; प्रवक्ता श्रीनिवासचे पत्रक

गडचिरोली : कोरची तालुक्यातील प्रस्तावित झेंडेपार लोहखाणीसाठी केवळ ४६ हेक्टरवर उत्खनन करणार असल्याचे कागदोपत्री नमूद आहे. मात्र,  एक हजार हेक्टरवर खाणकाम केले जाणार आहे. यामुळे त्याभागातील पर्यावरण धोक्यात येणार असून या खाणीला आमचा विरोध असल्याचे नक्षलवाद्यांनी पत्रकाच्या माध्यमातून जाहीर केल्याने २६ ऑक्टोबर रोजी खळबळ उडाली आहे. नक्षलवाद्यांच्या पश्चिम सबझोनल ब्युरो प्रवक्ता श्रीनिवास याच्या नावाने समाज माध्यमावर हे पत्र व्हायरल झाले आहे.
 
कोरची तालुक्यातील झेंडेपार टेकडीवरील लोहखाणीत उत्खननाच्या परवानगीसाठी १० ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यावरणविषयक जनसुनावणी पार पडली. यावेळी कोरची तालुक्यातील ग्रामसभा आणि स्थानिकांनी विरोध दर्शवला होता. त्यांच्या समर्थनार्थ आता नक्षलवाद्यांनी पत्रक काढले आहे. यात खाणीमुळे पारंपरिक जंगल नष्ट होऊन त्यावर अवलंबून असलेल्या आदिवासींचे जीवन सुद्धा धोक्यात येईल, परिसरातील धार्मिकस्थळ यामुळे प्रभावित होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

प्रशासन कागदोपत्री ४६ हेक्टरवर हे उत्खनन होणार असल्याचे जाहीर करत आहे. मात्र, यात तथ्य नसून प्रत्यक्षात पोलिस बाळाचा वापर करून एक हजार हेक्टरवर उत्खनन करण्याचा प्रशासनाचा डाव असल्याचे म्हटले आहे. यासाठी त्याभागातील मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. सुरजागडनंतर झेंडेपार व नंतर पूर्ण जिल्ह्यात खाणी सुरू करण्याचा कार्पोरेट कंपन्यांचा डाव असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे खाणविरोधी आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचे प्रवक्ता श्रीनिवास याने पत्रकात नमूद केले आहे. 

नक्षल्यांचे उघड आव्हान
जिल्हा पोलिसांनी विशेष अभियान राबवून गेल्या काही वर्षांत नक्षल्यांची चळवळ खिळखिळी केली. मागील दोन वर्षांत जिल्ह्यातून नवा सदस्य नक्षल्यांसोबत जोडला गेला नसल्याचा पोलिसांचा दावा आहे. मात्र, या पत्रकात हा दावा खोडून काढत उत्तर गडचिरोलीत आम्ही सक्रिय असल्याचे स्पष्ट करून उघड आव्हान दिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी डोके वर काढल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Naxalite opposition to Zendepar iron mine; Leaflet by Spokesperson Srinivas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.