नक्षली सावटात पर्यटन हरविले
By admin | Published: March 30, 2015 01:26 AM2015-03-30T01:26:41+5:302015-03-30T01:26:41+5:30
गडचिरोली हा राज्यातील मागास जिल्हा आहे. ८० टक्के जंगलव्याप्त गडचिरोली जिल्ह्यात वनपर्यटनाला मोठा वाव आहे. अनेक चांगले पर्यटनस्थळ जंगलाच्या कुशीत दडलेले आहेत.
गडचिरोली : गडचिरोली हा राज्यातील मागास जिल्हा आहे. ८० टक्के जंगलव्याप्त गडचिरोली जिल्ह्यात वनपर्यटनाला मोठा वाव आहे. अनेक चांगले पर्यटनस्थळ जंगलाच्या कुशीत दडलेले आहेत. जुने प्राचिन किल्लेसुध्दा जिल्ह्यात आहेत. मात्र याच्या देखभाल दुरूस्तीकडे जेवढे दुर्लक्ष आहे. तेवढेच दुर्लक्ष गडचिरोली जिल्ह्याच्या पर्यटन विकासाकडे आजवर शासनाचे झाले आहे. चांगले पर्यटनस्थळ असूनही नक्षलवाद्यांच्या दहशतीपोटी नागरिक या भागात भेटी देण्यास कानाडोळा करतात, असे दिसून आले आहे. काही पुण्या, मुंबईकडील पर्यटक व विदेशी पर्यटक सध्या लोकबिरादरी प्रकल्प व सर्चला मात्र भेटी देत असल्याचे दिसून येते.
जिल्ह्याचा दुर्लक्षित भाग असलेल्या भामरागड तालुक्यात बिनागुंडा हे थंड हवेचे ठिकाण. परंतु महाराष्ट्राच्या अन्य पर्यटन स्थळाकडे वळणारे पर्यटकांचे पावले या भागात येण्यासाठी नेहमीच अडखळतात. यामागे प्रमुख कारण म्हणजे, या भागाची नक्षल भाग म्हणून असलेली देशभर ओळख. भामरागड हा महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेला लागून असलेला शेवटचा तालुका. या भागात निसर्गाने मुक्त उधळण केली आहे. बाराही महिने वाहणारा राजरप्पी धबधबा या हा भागाचा वैभव. बिनागुंडा परिसराला भेट देऊन गेलेल कधीही राजरप्पी धबधब्याला विसरणार नाही इतके सुंदर असलेले हे ठिकाण. या भागात आदिवासीची दुर्मिळ जमात म्हणून ओळखले जाणारे बडामाडीया मोठ्या संख्येने वास्तव्याला आहे.
शेती हा त्यांचा उपजिविकेचा मुख्य व्यवसाय आपल्या घरी असलेल्या झाडूसाठी लागणारे उच्च प्रतीचे गवत या भागात उत्पन्न होते. पर्यटन व्यवसायाला प्रचंड वाव या ठिकाणी आहे. परंतु अडचण आहे ती नक्षल दहशतीमुळे या भागाकडे पावले न वळविणाऱ्या पर्यटकांची. या भागातील आदिवासी अत्यंत मेहनती आहे. पर्यटकांना आस्वाद देण्यासाठी आदिवासींचे खास पेय असलेला गोरगा येथे तयार केले जाते. आदिवासी त्याला आपले बिअर पेय समजतात. भामरागड परिसरात ३० रूपयाला एक बॉटल या दराने हे पेय विकले जाते. गोरगा मालक वर्षाला चार महिन्यात एका झाडापासून किमान दीड लाख रूपये या भरवशावर कमवितात. पिणाऱ्यांची संख्या जर भरपूर राहिली तर आदिवासींचे अर्थकारणच बदलून जाऊ शकते, ऐवढी ताकद या भागाच्या पर्यटन सौंदर्यात आहे.
परंतु नक्षल्याच्या दहशतीमुळे या पर्यटन स्थळाकडे पर्यटकांची तर पाठ आहेच शिवाय राज्य शासनाचेही या भागाच्या विकासाकडे कमालिचे दुर्लक्ष आहे. या भागात जाण्यासाठी साधा रस्ता नाही. दरवर्षी कोट्यावधी रूपयाचा निधी जिल्हा विकासासाठी येतो. परंतु यातून बिनागुंडा भागाचा विकास करावा, असे सरकारला अद्याप वाटलेले नाही. रस्ते व इतर सुविधा निर्माण झाल्यास पर्यटक निश्चितच या भागात येतील. परंतु या दृष्टीने आजपर्यंत कधीही प्रयत्न होत नाही, असे दिसून आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
आठ गावांचा समूह बिनागुंडा
ईशान्य भारताला सेव्हन सिस्टर्स म्हणून ओळखले जाते. गडचिरोली जिल्ह्याचा भामरागड तालुक्यातील आठ गावांचा समूह असलेला बिनागुंडा भाग निसर्गरम्य परिसर आहे. या भागात मूलभूत सोयी सुविधांचा अभाव असला तरी बिनागुंडा, कुव्वाकोडी, फोदेवाडा, कुर्रेमर्का, हामनमक्का, पुंगासूर, पेरमिल, भट्टी हे आठ गावे या आठ गावांचा एकमेकांशी रोटीबेटी संबंध आहे. सात डोंगर चढून सहा तास २० किमीचे अंतर लाहेरीवरून या भागात जाण्यासाठी आहे. परंतु आजवर स्थानिक लोकांशिवाय कुठलेही पर्यटक या भागाकडे वळलेले नाहीत.