गडचिरोलीत रस्त्याच्या कामावरील वाहनांची नक्षलवाद्यांकडून जाळपोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2022 04:35 PM2022-05-16T16:35:46+5:302022-05-16T17:14:30+5:30
जाळण्यात आलेल्या वाहनांमध्ये २ पोक्लीन,१ ट्रक आणि एका ग्रेडरचा समावेश असल्याची माहिती आहे.
गडचिरोली : एटापल्लीपासून १४ कि.मी अंतरावर एटापल्ली-कसनसूर या मार्गावरील मवेली या गावात रस्ते बांधकामावरील वाहने उभी करण्यात आली होती. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास नक्षलवाद्यांनी या वाहनांची जाळपोळ केल्याची माहिती समोर येत आहे.
एटापल्ली तालुक्यात (LWE) योजनेअंतर्गत मवेली ते पिपलीबुर्गी या २० कि.मी अंतराचे रस्ताबांधकाम गेल्या एक महिन्यापासून सुरू आहे. दिवसभरातील काम आटोपल्यानंतर ही वाहने एटापल्ली- कसनसूर मार्गावर असलेल्या मवेली गावात उभी केली जातात. रविवारी रात्री दीडच्या सुमारास नक्षल बांधकामस्थळी दाखल झाले. स्थानिक कर्मचाऱ्याला झोपेतून उठविले. त्यानंतर काही कळायच्या आत नक्षल्यांनी उभ्या असलेल्या वाहनांना लक्ष्य करीत वाहनांची जाळपोळ केल्याचे कळते.
जाळण्यात आलेल्या वाहनांमध्ये २ पोक्लीन, १ ट्रक आणि एका ग्रेडरचा समावेश असून अंदाजीत अडीच कोटींचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. झालेल्या घटनेसंदर्भात पोलीस विभागाला विचारणा केली असता घटनेला दुजोरा दिलेला आहे. तर, पोलिसांच्या तपासानंतर नेमके किती रुपयांचे नुकसान झाले हे तपासातून निष्पन्न होणार आहे.
दरम्यान, याच मार्गावर घटनास्थळापासून दीड कि.मी अंतरावर दुसर्या कंत्राटदाराचे कुदरी (बांडे ) नदीवर पुलाचे काम बांधकाम सुरू आहे. या घटनेनंतर भीतीपोठी येथील काम थांबवण्यात आले असून सर्व वाहने परत नेण्यात आली आहेत. दरम्यना, नक्षल्यांनी दोन दिवसांपूर्वी हालेवारा पोलीस मदत केंद्रातील एका व्यक्तीची हत्या केल्यानंतर ही दुसरी घटना घडवून आणल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.