झाडे पाडून नक्षल्यांनी केला रस्ता बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 11:31 PM2019-04-26T23:31:10+5:302019-04-26T23:31:35+5:30
एटापल्ली तालुक्यातील जांभियागट्टा व अडांगे या गावादरम्यान नक्षल्यांनी विविध ठिकाणी झाडे पाडून रस्ता बंद केला आहे. मागील वर्षी भामरागड तालुक्यातील कसनासूर जंगलात नक्षल व पोलीस यांच्यात चकमक झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील जांभियागट्टा व अडांगे या गावादरम्यान नक्षल्यांनी विविध ठिकाणी झाडे पाडून रस्ता बंद केला आहे.
मागील वर्षी भामरागड तालुक्यातील कसनासूर जंगलात नक्षल व पोलीस यांच्यात चकमक झाली होती. या चकमकीत जवळपास ४० नक्षलवादी ठार झाले होते. या घटनेला वर्षपूर्ती झाली. यानिमित्त २२ ते २८ एप्रिलदरम्यान नक्षलवाद्यांनी बंदचे आवाहन केले आहे. या निमित्त नक्षलवाद्यांनी ठिकठिकाणी झाडे पाडून रस्ता बंद केला. बंद पाळण्याचे आवाहनही केले. गावांमध्ये बॅनर बांधले आहेत. तसेच रस्त्याच्या सभोवताल नक्षल पत्रकेही टाकली आहेत. नक्षल्यांच्या बॅनर व पत्रकबाजीमुळे दुर्गम भागात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठमोठी झाडे रस्त्यावर टाकल्याने चारचाकी वाहनांची वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे नागरिक दुचाकीने प्रवास करीत आहेत.