गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी जाळला लाकूड डेपो; दीड कोटींच्या नुकसानाचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 09:53 AM2018-04-18T09:53:31+5:302018-04-18T09:53:38+5:30
चामोर्शी तालुक्यातील घोट येथे असलेला वनविभागाचा लाकूड डेपो नक्षलवाद्यांनी बुधवारी मध्यरात्री जाळला. यात लाखो रुपयांचे बांबू व सागवान लाकडे जळाले. त्या ठिकाणी नक्षल्यांनी एटापल्ली तालुका बंद करण्याचे आवाहन करणारी पत्रकेही टाकल्याचे आढळले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील घोट येथे असलेला वनविभागाचा लाकूड डेपो नक्षलवाद्यांनी बुधवारी मध्यरात्री जाळला. यात लाखो रुपयांचे बांबू व सागवान लाकडे जळाले. त्या ठिकाणी नक्षल्यांनी एटापल्ली तालुका बंद करण्याचे आवाहन करणारी पत्रकेही टाकल्याचे आढळले.
मध्यरात्री साडेबारा ते एक वाजताच्या सुमारास १५ ते २० सशस्त्र नक्षलवादी घोट येथील लाकूड डेपोवर गेले. त्यापैकी दोघे चौकीदाराकडे आले तर बाकींनी रॉकेल ओतून बांबू व लाकडांना आग लावली. या घटनेनंतर पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास गडचिरोली व अहेरी येथील अग्निशमन वाहन तसेच आलापल्ली येथील वनविभागाचे वाहन घटनास्थळी पोहचले. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत बरीच लाकडे जळून राख झाली होती. हे लाकडी बिट वनविभागासह जंगल कामगार सहकारी संस्थांचे असल्याची माहिती आहे.
घटनास्थळी नक्षल्यांनी टाकलेली पत्रकेही टाकली. ३० मार्चला एटापल्ली तालुक्यातील रेकनार-हुमडी येथील जंगलात झालेली पोलिस-नक्षल चकमक बनावट असून, सोनू उसेंडी यास खोट्या चकमकीत ठार केल्याचा आरोप नक्षल्यांनी केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ नक्षल्यांनी आज एटापल्ली तालुका बंदचे आवाहन त्या पत्रकातून केले आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले असून या आगीत सुमारे दीड लाखांचे लाकूड भस्मसात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.