नक्षल्यांनी जमिनीत दडवून ठेवलेला शस्त्रसाठा जप्त; एसआरपीएफ, गॅरापत्ती पोलिसांची कारवाई
By संजय तिपाले | Published: April 9, 2023 09:46 AM2023-04-09T09:46:54+5:302023-04-09T09:47:06+5:30
सुरक्षा यंत्रणेला धोका पोहोचविण्याचा होता कट
गडचिरोली: सुरक्षा यंत्रणेला धोका पोहोचविण्याचा उद्देशाने जमिनीत दडवून ठेवलेला शस्त्रसाठा एसआरपीएफ जवान व गॅरापत्ती पोलिसांनी संयुक्त कारवाई करून पकडला. ही कारवाई धानोरा उपविभागांतर्गत गॅरापत्ती पोलिस मदत केंद्र हद्दीतील टिपागड जंगलात ७ एप्रिल रोजी करण्यात आली.या कारवाईने नक्षलवाद्यांचा कट उधळून लावण्यात पुन्हा एकदा पोलिसांना यश आले.
या कारवाईत १२ रायफल, २ स्फोटके व इतर शस्त्र साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांना नुकसान पोहोचविण्यासाठी तसेच घातपात घडवून आणण्यासाठी नक्षलवादी गोपनीय पद्धतीने जमिनीत शस्त्रे पुरवून ठेवतात. नक्षल सप्ताह व इतरवेळी या शस्त्रांचा वापर केला जातो. दरम्यान, नक्षलविरोधी अभियान राबविताना या शस्त्रसाठ्याविषयी पोलिस यंत्रणेला गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार, ७ एप्रिलला एसआरपीएफ जवान व गॅरापत्ती पोलिस मदत केंद्रांच्या पोलिसांनी संयुक्त मोहीम हाती घेतली. हा शस्त्रसाठा सुरक्षितपणे हस्तगत करून नक्षल्यांचा घातपाताचा कट उधळून लावला. पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अहेरीचे अपर अधीक्षक यतीश देशमुख, धानोराचे उपअधीक्षक स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.