नक्षल्यांकडून गोळ्या झाडून युवकाची हत्या, पैशांचा घोळ केल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 05:57 PM2018-01-31T17:57:12+5:302018-01-31T17:59:07+5:30
नक्षल समर्थक म्हणून पोलिसांकडे नोंद असलेल्या युवकाची बुधवारी नक्षल्यांनीच भर बाजारात गोळ्या झाडून हत्या केली. ईरपा बिरा उसेंडी (३०) रा.अपनपल्ली असे मृतकाचे नाव आहे. ही घटना बुरगी येथे दुपारी २.३० वाजता घडली.
एटापल्ली (गडचिरोली) : नक्षल समर्थक म्हणून पोलिसांकडे नोंद असलेल्या युवकाची बुधवारी नक्षल्यांनीच भर बाजारात गोळ्या झाडून हत्या केली. ईरपा बिरा उसेंडी (३०) रा.अपनपल्ली असे मृतकाचे नाव आहे. ही घटना बुरगी येथे दुपारी २.३० वाजता घडली.
प्राप्त माहितीनुसार, ईरपा उसेंडी हा काही नातेवाईकांसह बुरगीच्या आठवडी बाजारालगत भरलेल्या कोंबड बाजारात गेला होता. सर्वजण बाजारात व्यस्त असताना टायर फुटल्यासारखा आवाज आला. जमलेल्या लोकांनी पाहीले असता ईरपा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यामुळे एकच पळापळ सुरू झाली. दोन नक्षलवाद्यांनी ईरपाच्या डोक्यात एक गोळी तर दुसरी हवेत झाडली होती.
विशेष म्हणजे बुरकी गावातील उपपोलीस स्टेशन घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर आहे. पण कोणीही पोलीस कर्मचारी बाहेर निघाले नाही. गडबड झाल्याचे लक्षात येताच पोलिसांनी ठाण्यातील धोक्याची घंटा वाजविली. पण तोपर्यंत दोन्ही नक्षलवादी जंगलाच्या दिशेने पसार झाले होते.
दलम कमांडरचा भाऊ
विशेष म्हणजे मृत ईरपा उसेंडी हा नक्षल्यांचा दलम कमांडर साईनाथचा चुलत भाऊ असून नोटबंदीच्या काळात नक्षल्यांचे पैसे लपविल्याच्या आरोपात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. डिसेंबर २०१६ मध्ये सुरजागड प्रकल्पावरील लोहखनिज उत्खननादरम्यान नक्षल्यांनी ७८ वाहने जाळली होती. त्यानंतर नक्षल्यांशी झालेल्या वाटाघाटीत ईरपाने घोळ केल्याचा संशय नक्षल्यांना होता. त्यातूनच ही हत्या झाल्याचे बोलले जाते.