गडचिरोलीत नक्षल्यांनी केली पोलीस पाटलाची निर्घृण हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:42 AM2018-02-23T11:42:14+5:302018-02-23T11:43:41+5:30
नक्षल्यांच्या हालचालींची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयातून लांझी येथील पोलीस पाटलाची नक्षल्यांनी बेदम मारहाण करून आणि दगडांनी ठेचून निर्घृण हत्या केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षल्यांच्या हालचालींची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयातून लांझी येथील पोलीस पाटलाची नक्षल्यांनी बेदम मारहाण करून आणि दगडांनी ठेचून निर्घृण हत्या केली. ही घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली. कटीया पेका कुमोटी (६०) असे मृत पोलीस पाटलाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, एटापल्ली या तालुका मुख्यालयापासून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या लांझी या गावाचे पोलीस पाटील कटीया कुमोटी हे गावापासून १ किलोमीटरवर असलेल्या आपल्या शेतातील घरात पत्नी, मुलगा व सून यांच्यासह राहतात. बुधवारी रात्री ते घरात झोपलेले असताना ३ महिला व ३ पुरूष असे सहा सशस्त्र गणवेषधारी नक्षलवादी तिथे आले. त्यांनी कुमोटी यांना झोपेतून उठवून त्यांचे दोन्ही हात मागे दोरीने बांधले व जंगलाच्या दिशेने घेऊन गेले. यावेळी कुटुंबातील लोकांना त्यांना नेऊ नका अशी विनवणी केली, पण नक्षल्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
दरम्यान गुरूवारी (दि.२२) सकाळी ताडपल्ली मार्गावर त्यांचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळला. मृतदेहाजवळ एक चिठ्ठी लिहीलेली होती. त्यात काही दिवसांपूर्वी लांझी गावाजवळ झालेल्या नक्षल चकमकीत एक नक्षलवादी पोलिसांकडून मारल्या गेला. त्यावेळी कुमोटी यांनीच पोलिसांना नक्षल्यांची माहिती दिली असून तो पोलिसांचा खबऱ्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्या चिठ्ठीवर कसनसूर एरिया कमिटीचा उल्लेख आहे. तालुक्यातील सुरजागड लोहखनिज वाहतुकीच्या संरक्षणासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात असतानाही नक्षली हिंसक घटना घडविण्यात यशस्वी होत आहेत. काही दिवसांपूर्वी बुर्गी येथे पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरील कोंबड बाजारात भरदिवसा एकाची नक्षल्यांनी हत्या केली होती.