दुर्गम भागात नक्षल्यांचे पोस्टर युद्ध सुरू
By admin | Published: October 9, 2016 01:43 AM2016-10-09T01:43:51+5:302016-10-09T01:43:51+5:30
: आॅपरेशन ग्रीन हन्डच्या विरोधात माओवादी संघटनांनी ५ ते ११ आॅक्टोबर या कालावधीत सप्ताह सुरू केला आहे.
वाहतुकीवरही परिणाम : १० व ११ आॅक्टोबरला बंद पाळण्याचे आवाहन
गडचिरोली : आॅपरेशन ग्रीन हन्डच्या विरोधात माओवादी संघटनांनी ५ ते ११ आॅक्टोबर या कालावधीत सप्ताह सुरू केला आहे. तर १० व ११ आॅक्टोबरला देशव्यापी बंदचे आवाहन केले आहे. यादृष्टीने दुर्गम भागात मोठ्या प्रमाणावर नक्षल बॅनर व पोस्टर लावण्यात आले आहे. अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टा, देचलीपेठा भागासह एटापल्ली तालुक्याच्या विविध भागांमध्ये नक्षलवाद्यांनी पोस्टर लावले आहे.
मुलचेरा तालुक्याच्या बोलेपल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतही एटापल्ली, मुलचेरा, गडचिरोली मार्गावर रात्रीच्या सुमारास नक्षलवाद्यांनी पत्रक लावले आहे. पोलीस प्रशासनानेही नक्षलवाद्यांच्या या कारवाया लक्षात घेऊन युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. एटापल्ली तालुक्यात परवा नक्षल व पोलिसात चकमक उडाली. दुर्गम भागात नक्षल पत्रक व बॅनर लागले असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली असून १० व ११ तारखेला बंद पाळण्याचे आवाहन माओवाद्यांनी केले असल्यामुळे ग्रामीण भागाच्या जनजीवनावरही याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (लोकमत वृत्तसेवा)