गडचिरोली भागात नक्षल्यांकडून गोळ्या झाडून युवकाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 07:51 PM2018-01-31T19:51:25+5:302018-01-31T19:52:47+5:30
नक्षल समर्थक म्हणून पोलिसांकडे नोंद असलेल्या युवकाची बुधवारी नक्षल्यांनीच भर बाजारात गोळ्या झाडून हत्या केली. ईरपा बिरा उसेंडी (३०) रा.अपनपल्ली असे मृताचे नाव आहे. ही घटना बुरगी येथे दुपारी २.३० वाजता घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षल समर्थक म्हणून पोलिसांकडे नोंद असलेल्या युवकाची बुधवारी नक्षल्यांनीच भर बाजारात गोळ्या झाडून हत्या केली. ईरपा बिरा उसेंडी (३०) रा.अपनपल्ली असे मृताचे नाव आहे. ही घटना बुरगी येथे दुपारी २.३० वाजता घडली.
प्राप्त माहितीनुसार, ईरपा उसेंडी काही नातेवाईकांसोबत बुरगीच्या आठवडी बाजारालगत भरलेल्या कोंबड बाजारात गेला होता. सर्वजण बाजारात व्यस्त असताना अचानकटायर फुटल्यासारखा आवाज आला. आणि क्षणार्धात ईरपा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्यामुळे एकच पळापळ सुरू झाली. दोन नक्षलवाद्यांनी ईरपाच्या डोक्यात एक गोळी तर दुसरी हवेत झाडली होती.
विशेष म्हणजे बुरकी गावातील उपपोलीस स्टेशन घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर आहे. पण एकही पोलीस कर्मचारी बाहेर निघाला नाही. बाहेरचा कोलाहल लक्षात येताच पोलिसांनी ठाण्यातील धोक्याची घंटा वाजविली. पण तोपर्यंत दोन्ही नक्षलवादी जंगलाच्या दिशेने पसार झाले होते.
दलम कमांडरचा भाऊ
विशेष म्हणजे मृत ईरपा उसेंडी हा नक्षल्यांचा दलम कमांडर साईनाथचा चुलत भाऊ असून नोटाबंदीच्या काळात नक्षल्यांना पैसे लपविण्यास मदत केल्याच्या आरोपात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. डिसेंबर २०१६ मध्ये सुरजागड प्रकल्पावरील लोहखनिज उत्खननादरम्यान नक्षल्यांनी ७८ वाहने जाळली होती. त्यानंतर नक्षल्यांशी झालेल्या वाटाघाटीत ईरपाने घोळ केल्याचा संशय होता. त्यातूनच ही हत्या झाल्याची चर्चा आहे.