नक्षलवाद्यांनी युद्ध नव्हे बुद्धाचे विचार स्वीकारावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 11:57 PM2018-11-01T23:57:44+5:302018-11-01T23:58:08+5:30
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर तत्कालीन समाजाने मोठा अन्याय केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अन्यायाची मोठी चिड होती. मात्र त्यांनी युद्धाचा मार्ग न स्वीकारता बुद्धाचा मार्ग स्वीकारून समाज परिवर्तन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर तत्कालीन समाजाने मोठा अन्याय केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अन्यायाची मोठी चिड होती. मात्र त्यांनी युद्धाचा मार्ग न स्वीकारता बुद्धाचा मार्ग स्वीकारून समाज परिवर्तन केले. आपल्यावर अन्याय झाला, असे नक्षलवाद्यांना वाटत असेल तर त्यांनी बंदुकी सोडून शांतीच्या मार्गाने वाटाघाटी कराव्या, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
रामदास आठवले हे गुरूवारी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाºया विविध योजनांची माहिती दिली. देशभरात २ कोटी ६७ लाख नागरिक तर गडचिरोली जिल्ह्यात नऊ हजार नागरिक विकलांग आहेत. अपंग विकास महामंडळामार्फत त्यांना रोजगारासाठी मदत केली जात आहे. त्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी विविध प्रशिक्षण आयोजित केले जात आहे. केंद्र शासनामार्फत त्यांना साहित्य उपलब्ध करून दिले जात आहेत. भटक्या जमातींचे पुनर्वसन करून त्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहेत. वृद्धाश्रम उघडण्यासाठी एखादी सामाजिक संस्था पुढे आल्यास त्याला परवानगी देऊन अनुदान सुद्धा उपलब्ध करून दिले जाईल.
विदर्भात झुडूपी जंगल मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी मोठे जंगल होऊ शकत नाही. सदर जमीन गरजू शेतकºयांना कसण्यासाठी द्यावी, यादृष्टीने केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. रॉफेल खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याची ओरड राहुल गांधी करीत असले तरी या आरोपामध्ये काही तत्थ्य नाही. महागाईनुसार थोडीफार किंमत वाढली आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या आठ हजार विद्यार्थी व अनुसूचित जमातीच्या चार हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला आहे. २०१७-१८ मध्ये २०० आंतरजातीय विवाह पार पडले. या जोडप्यांना राज्य शासनाकडून ५० हजार रूपयांचे अनुदान देण्यात आले. केंद्र शासनाकडून दोन लाख रूपयांचे अनुदान दिले जाणार आहे. संबंधित जोडप्यांचे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांच्या जेवनाच्या व राहण्याच्या व्यवस्थेसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. गडचिरोली जिल्ह्यात २०१६-१७ यावर्षात २४, २०१७-१८ या वर्षात ४७ व २०१८-१९ मध्ये ४० विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती आठवले यांनी दिली. पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी उपस्थित होते.