नक्षलवाद्यांनी केली सुरुवात, पोलिसांनी केला त्यांचा शेवट; सात पुरुष, पाच महिला नक्षल्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 07:06 AM2024-07-19T07:06:40+5:302024-07-19T07:06:59+5:30

दोन कोटींची होती बक्षिसे

Naxalites started, police ended them; Seven male, five female Naxals killed | नक्षलवाद्यांनी केली सुरुवात, पोलिसांनी केला त्यांचा शेवट; सात पुरुष, पाच महिला नक्षल्यांचा खात्मा

नक्षलवाद्यांनी केली सुरुवात, पोलिसांनी केला त्यांचा शेवट; सात पुरुष, पाच महिला नक्षल्यांचा खात्मा

गडचिरोली : छत्तीसगड सीमेवरील जारावंडी पोलिस ठाणे  हद्दीतील वांढाेली गावानजीक जवान व नक्षल्यांत झालेल्या जोरदार धुमश्चक्रीत ठार झालेल्या १२ नक्षलींची पोलिसांनी रात्रीतून ओळख पटवली आहे. मृतांमध्ये सात पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे.  महाराष्ट्र व छत्तीसगडमध्ये हे सर्व जण ‘मोस्ट वाँटेड’ होते. त्यांच्यावर दोन्ही राज्यांची मिळून सुमारे दोन कोटींहून अधिक बक्षिसे होती. या चकमकीदरम्यान पहिली गोळी नक्षल्यांनी झाडली होती, ती जवानाच्या बोटाला चाटून गेली, त्यानंतर १२ नक्षल्यांना कंठस्नान घालून पोलिसांनी मोहीम फत्ते केली.

या थरारनाट्याची पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी शुक्रवारी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, की जारावंडी ठाणे हद्दीतील वांढाेली जंगल परिसरात १२ ते १५ नक्षलवादी  मोठा घातपात घडविण्याच्या उद्देशाने एकत्र आल्याची माहिती मिळताच सी-६० या विशेष नक्षलविराेधी पथकाचे २०० जवान भरपावसात मोहिमेवर रवाना केले. नक्षल्यांच्या वाटेत पाच मोठे नाले आले. पावसामुळे ते धो-धो   वाहत होते. मात्र, जवानांनी जिवाची बाजी लावून पैलतीरी जाऊन कर्तव्य बजावले.

गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करणार : मुख्यमंत्री

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली पोलिसांचे विशेष अभिनंदन करीत गडचिरोली जिल्हा संपूर्णपणे नक्षलमुक्त करण्याचा निर्धार बोलून दाखविला.

जवानांना ५१ लाख रुपयांचे विशेष बक्षीस : उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईत सहभागी असलेल्या जवानांना ५१ लाख रुपयांचे विशेष बक्षीस जाहीर केले आहे.

३०० गंभीर गुन्हे

मृत १२ नक्षल्यांवर खून, जाळपोळ, दरोडा यासारखे सुमारे ३०० गुन्हे नोंद आहेत. २०२१ रोजी झालेल्या मार्दीनटोला चकमकीनंतर गडचिरोली पोलिसांना मिळालेले हे सर्वांत मोठे यश आहे.

या चकमकीनंतर कोरची-टिपागड आणि चातगाव-कसनसूर दलम पूर्णपणे संपल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.

जखमी जवानांची प्रकृती स्थिर

चकमकीत जखमी झालेले उपनिरीक्षक सतीश पाटील, जवान शंकर पोटावी आणि विवेक शेंगोळे या तिघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे नीलोत्पल यांनी सांगितले.

साडेतीन वर्षांत ८० जण ठार

२०२१ पासून साडेतीन वर्षांत गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी कारवाईत ८० नक्षलवादी ठार झाले, तर १०२ जणांना अटक करण्यात आली. यादरम्यान २९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.

मृतांमध्ये तीन नक्षल नेत्यांचा समावेश

चातगाव- कसनसूर संयुक्त दलम प्रमुख, तसेच विभागीय समिती सदस्य योगेश दावसिंग तुलावी ऊर्फ नरेंद्र ऊर्फ निरींगसाय (३६, रा. भिमनखोजी, ता. कोरची),  कोरची-टिपागड संयुक्त दलमप्रमुख तसेच विभागीय समिती सदस्य विशाल कुल्ले आत्राम ऊर्फ लक्ष्मण ऊर्फ सरदू (४३, रा. गोरगुट्टा, ता. एटापल्ली), टिपागड दलम विभागीय समिती सदस्य प्रमोद लालसाय कचलामी ऊर्फ दलपट (३१, रा. वडगाव, ता. कोरची) या तीन नेत्यांचा मृतांत समावेश आहे. याशिवाय एरिया कमिटी मेंबर व उपकमांडर महारू धोबी गावडे (३१, रा. नैनेर, ता. अहेरी), अनिल देवसाय दर्रो ऊर्फ देवा ऊर्फ देवारी (२८, रा. मुरकुटी, ता. कोरची), एरिया कमिटी मेंबर विज्जू (रा. बस्तर एरिया छत्तीसगड), सरिता जारा परसा ऊर्फ मीना ऊर्फ रामे (३७, रा. गळदापल्ली, ता. एटापल्ली), रज्जो मंगलसिंग गावडे ऊर्फ समिता ऊर्फ सिरोंती (३५, रा. बोटेझरी, ता. कोरची), दलम सदस्य रोजा (रा. बस्तर एरिया, छत्तीसगड), सागर (रा. बस्तर एरिया छत्तीसगड), चंदा पोड्याम (रा. माड, छत्तीसगड), सीता हवके (२७, रा. मोरडपार, ता. भामरागड) हेही ठार झाले.

Web Title: Naxalites started, police ended them; Seven male, five female Naxals killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.