नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग त्यागावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 01:17 AM2019-02-14T01:17:29+5:302019-02-14T01:20:42+5:30
हिंसा कोणत्याच गोष्टीवरील उपाय नाही. समस्त नागरिकांनीच नाही तर नक्षलवाद्यांनीही धर्माला बाजूला ठेवून मानवतेला महत्त्व द्यावे आणि अहिंसेच्या माध्यमातून प्रश्नांची सोडवणूक करावी, अशी अपेक्षा सेवाग्राम आश्रमातील महात्मा गांधीचे अनुयायी जालंधरनाथ आणि योगेश मथुरिया यांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : हिंसा कोणत्याच गोष्टीवरील उपाय नाही. समस्त नागरिकांनीच नाही तर नक्षलवाद्यांनीही धर्माला बाजूला ठेवून मानवतेला महत्त्व द्यावे आणि अहिंसेच्या माध्यमातून प्रश्नांची सोडवणूक करावी, अशी अपेक्षा सेवाग्राम आश्रमातील महात्मा गांधीचे अनुयायी जालंधरनाथ आणि योगेश मथुरिया यांनी व्यक्त केली.
महात्मा आणि कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जन्मवर्षानिमित्त साधू वासवानी मिशन पुणेच्या सहकार्याने त्यांनी चार राज्यात शांतीयात्रेचे आयोजन केले आहे. यानिमित्त बुधवारी गडचिरोलीत आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते.
या शांती यात्रेचा बुधवारी ३३ वा दिवस होता. गडचिरोलीच्या मगन संग्रहालयात पोहोचली. या यात्रेतील विश्व मित्र योगेश यांनी गेल्या ५ वर्षात १२ हजार ६७६ किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण केला आहे. त्यात भारतासह श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेतही त्यांनी शांती मार्च काढला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील प्रवास पूर्ण करून ही शांती यात्रा छत्तीसगड, ओरिसा, पश्चिम बंगाल मार्गे बांगला देशला जाणार आहे. मार्गातील शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विश्वशांतीबाबत आणि गांधीजींच्या अहिंसा तत्वाबाबत मार्गदर्शन व जनजागृती करीत असल्याचे त्यांनी सांगितले.