पुलाच्या कामाला नक्षल्यांनी विरोध करू नये
By admin | Published: September 10, 2016 01:09 AM2016-09-10T01:09:16+5:302016-09-10T01:09:16+5:30
भामरागड तालुक्यातील जुवी नाल्यावर पूल बांधण्याच्या कामाला नक्षलवाद्यांनी विरोध करू नये,
वेळापत्रक गडबडले : भूमकाल संघटनेचे आवाहन
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील जुवी नाल्यावर पूल बांधण्याच्या कामाला नक्षलवाद्यांनी विरोध करू नये, या कामाला पाठींबा जाहीर करावा, असे आवाहन भूमकाल संघटनेचे सचिव दत्ता शिरके यांनी केले आहे. भूमकाल संघटनेने म्हटले आहे की, नेलगुंडा गावात मे महिन्यात नदी, नाला पूल विकास परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर सहा सभा भूमकाल संघटनेने या भागात घेतल्या. आपण आपला विकास करू या तत्वावर श्रमदानातून पुलाचे निर्माण करण्याचा नवा प्रयोग करण्यात येणार होता. या कामाला लागणारा तांत्रिक सहाय्य व साधन सामुग्री भूमकाल संघटना पुरवेल, असे ठरले होते. पोळ्यानंतर श्रमदान सुरू होणार होते. जुवी नाल्यावर सिमेंट पाईप टाकण्यात आले. मात्र भामरागड एरिया कमिटीचा कमांडर दिनेश याने नेलगुंडा येथे सभा घेऊन पुलाचे काम करण्यास मनाई केली. त्यामुळे वेळापत्रक गडबडले. कामात पुढाकार घेणाऱ्यांना जीवानिशी ठार मारण्याची धमकी दिली, असेही भूमकाल संघटनेने म्हटले आहे. माओवाद्यांना पाठींब्याचे आवाहन केले आहे. या पुलामुळे आदिवासींचा विकास होणार असल्याचे म्हटले आहे.