नक्षलवाद्यांनी दहशतीने केला गावकऱ्यांचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 05:00 AM2020-05-24T05:00:00+5:302020-05-24T05:00:40+5:30
गजामेंढी येथील नागरिकांनी सांगितले की, टिपागड दलमचा नक्षलवादी सावजी तुलावी, कंपनी क्रमांक ४ चा नक्षलवादी नवलुराम तुलावी व प्लाटून क्र. ४ चा कमांडर राजा मडावी यांच्यासह जवळपास २० नक्षलवादी २० मे रोजी गावात आले. गावकऱ्यांकडून जबरजस्तीने पैसे व धान्य गोळा करून जंगलात गेले. काही वेळानंतर पुन्हा गावात येऊन आमच्यासोबत जंगलात या, अशी तंबी गावकऱ्यांना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील गजामेंढी गावाजवळ २० मे रोजी नक्षलवाद्यांनी चार वाहनांना आग लावली. दोन्ही बाजूने झाडे पाडण्यासाठी नक्षलवाद्यांनी गावकऱ्यांचा वापर केला, अशी माहिती गजामेंढीवासीयांनी दिली. नक्षलवाद्यांच्या या कृत्याचा नागरिकांनी २३ मे रोजी नक्षल बॅनर जाळून निषेध केला.
गजामेंढी येथील नागरिकांनी सांगितले की, टिपागड दलमचा नक्षलवादी सावजी तुलावी, कंपनी क्रमांक ४ चा नक्षलवादी नवलुराम तुलावी व प्लाटून क्र. ४ चा कमांडर राजा मडावी यांच्यासह जवळपास २० नक्षलवादी २० मे रोजी गावात आले. गावकऱ्यांकडून जबरजस्तीने पैसे व धान्य गोळा करून जंगलात गेले. काही वेळानंतर पुन्हा गावात येऊन आमच्यासोबत जंगलात या, अशी तंबी गावकऱ्यांना दिली. जो त्यांच्यासोबत येणार नाही त्याला बंदूकीचा धाक दाखविण्यात आला. त्यामुळे एकही जण नक्षलवाद्यांना विरोध करू शकला नाही. नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे गावकरी सावरगाव-मुरूमगाव मुख्य मार्गावर आले. नक्षलवाद्यांनी गावकऱ्यांना रस्त्याच्या दोन्ही बाजूस उभे करून पोलीस आल्यास माहिती देण्यास सांगीतले. त्यानंतर झाडे तोडून ४ वाहनांना आग लावली. नक्षलवाद्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी आमचा ढालीसारखा वापर केला, अशी माहिती गावकऱ्यांनी दिला. नक्षलवाद्यांच्या या कृत्याचा गावकऱ्यांनी २३ मे रोजी निषेध केला. बंदुकीचा धाक दाखविणारे आमचे कैवारी होऊच शकत नाही. नक्षलवाद्यांच्या विरोधामुळे दुर्गम व आदिवासी भागाचा विकास रखडला आहे, असे सांगत नक्षलवाद्यांचे बॅनर जाळले. तसेच नक्षलवाद्यांनी जाळलेली वाहने पोलिसांच्या मदतीने रस्त्याच्या बाजुला केली.
नक्षलवाद्यांच्या आमिषांना बळी पडू नका
गजामेंढी येथील गावकºयांनी दाखविलेल्या हिमतीचे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कौतुक केले. तेलगू नक्षलवाद्यांच्या खोट्या आमिशाला स्थानिक आदिवासी नागरिकांनी बळी पडू नये. आजपर्यंत ज्या नक्षलवाद्यांनी पोलिसांमसोर आत्मसमर्पण केले आहे, ते सुखी व समाधानी जीवन जगत आहेत. नक्षलवाद्यांच्या नातेवाईकांनीही नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी प्रवृत्त करावे. त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ दिला जाईल, असे आवाहन एसपींनी केले आहे.