आत्मसमर्पित नक्षलींची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल; फिनाईल निर्मितीसह घेतले व्यावसायिक प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2022 01:53 PM2022-06-10T13:53:11+5:302022-06-10T13:58:28+5:30
खा. सुप्रिया सुळे यांनी आत्मनिर्भर झालेल्या आत्मसमर्पित महिलांचे विशेष कौतुक करत त्यांचा सत्कार केला.
गडचिरोली : नक्षल चळवळीतून बाहेर पडून सामान्य जीवन जगू इच्छिणाऱ्या आत्मसमर्पित महिला नक्षलींनी आता विविध व्यवसायातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू केली आहे. फ्लोअर क्लिनर फिनाईलची निर्मिती करण्यात पारंगत झाल्यानंतर आता काही महिलांनी इतरही व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन वेगवेगळ्या व्यवसायात भरारी घेण्याची तयारी सुरू केली आहे.
गडचिरोली पोलीस दलाच्या ‘पोलीस दादालोरा खिडकी’ या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील गरजू बेरोजगारांसह आत्मसमर्पित नक्षलींनाही विविध प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात आहे. नक्षल चळवळीतून बाहेर पडल्यानंतर शासनाच्या योजनेप्रमाणे त्यांना विविध प्रकारचे लाभ, निवारा मिळत असला तरी मिळकतीसाठी कोणतेतरी कौशल्य असणे गरजेचे असते. त्यासाठीच पोलीस विभागाकडून त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या रोजगार मेळाव्यात हॉस्पिटॅलिटी आणि नर्सिंग असिस्टंट प्रशिक्षणाकरिता निवड झालेल्या दुर्गम भागातील १५७ युवतींना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच खा.सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ५७ प्रशिक्षणार्थी महिलांना शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. यावेळी खा.सुळे यांनी आत्मनिर्भर झालेल्या आत्मसमर्पित महिलांचे विशेष कौतुक करत त्यांचा सत्कार केला.