मी धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम शपथ घेतो की...; चौथ्यांदा मंत्री

By संजय तिपाले | Published: July 2, 2023 03:57 PM2023-07-02T15:57:26+5:302023-07-02T15:57:52+5:30

पुन्हा एकदा अहेरीच्या राजघराण्याकडे सत्तासूत्रे.

ncp dharmarao baba bhagwantrao atram taking oath of as minister | मी धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम शपथ घेतो की...; चौथ्यांदा मंत्री

मी धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम शपथ घेतो की...; चौथ्यांदा मंत्री

googlenewsNext

संजय तिपाले, गडचिरोली: जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार व आदिवासींचे नेते धर्मरावबाब आत्राम हे अजित पवार यांच्यासोबतच्या बंडात सहभागी आहेत. २ जुलै रोजी त्यांनी अजित पवारांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. मी धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम ईश्वरसाक्ष शपथ घेतो की... असे शब्द त्यांनी उच्चारताच कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. त्यांनी यापूर्वी तीननवेळा राज्यमंत्रीपद भूषविले होते. आता कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेऊन त्यांनी चौथ्यांदा मंत्रिमंडळात समावेश एंट्री केली आहे.  

ग्रामपंचायत सदस्य ते राज्याचे कॅबिनेट मंत्री असा धर्मरावबाबा यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास आहे. अहेरीच्या आत्राम राजघराण्यातून आलेल्या धर्मरावबाबांनी राजकीय, सामाजिक जीवनात कायम संघर्ष केला. १९७५ मध्ये अहेरी ग्रामपंचायातचे सदस्य म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर १९८० मध्ये पंचायत समिती सभापतीपदी विराजमान झाले. पुढे १९९० मध्ये पूर्वीच्या सिरोंचा मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर १९९९, २००४ व २०१९ मध्ये ते आमदार झाले. त्यांनी यापूर्वी तीनवेळा राज्यमंत्रिपद भूषविले हाेते, आता ते नव्या राजकीय सत्तासमीकरणात भाजप- शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या सरकारमध्येही त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. पहिल्या पाच मंत्र्यांमध्ये त्यांनी शपथ घेतली. धर्मरावबाबांची मंंत्रिमंडळात वर्णी लागताच इकडे गडचिरोलीत जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, युवक जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर यांच्यासह समर्थक व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

लोकसभेच्या तोंडावर मिळाली उभारी

धर्मरावबाबा आत्राम यांनी गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी केलेली आहे. आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे, पण तो राष्ट्रवादीला सोडविण्यासाठी त्यांनी ताकद पणाला लावली होती, शिवाय सर्व पर्याय खुले ठेवले होते. मात्र, नव्या राजकीय घडामोडीत त्यांनी अजित पवारांच्या गटासह मंत्रिपदाची शपथ घेतली. ते लोकसभा कोणत्या पक्षाकडून लढतील, हे अनिश्चित आहे, पण त्यापूर्वी मंत्रिपदी वर्णी लागल्याने त्यांच्या नेतृत्वाला उभारी मिळाल्याची चर्चा कार्यकर्त्यांत आहे.

राजघराण्याची परंपरा कायम

आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्याला मंत्रिपद मिळाले ते राजघराण्याच्या माध्यमातूनच. यापूर्वीच्या सरकारमध्ये धर्मरावबाबा आत्राम यांचे पुतणे अम्ब्रीशराव आत्राम मंत्री होते. अम्ब्रीशरावांना पराभूत करुन दहा वर्षांनंतर विधानसभेत पोहोचलेल्या धर्मरावबाबांना मंत्रिपद मिळाल्याने अहेरी व राजघराण्याच्या राजसत्तेची परंपरा कायम राहिली आहे.

Web Title: ncp dharmarao baba bhagwantrao atram taking oath of as minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.