गडचिरोली जिल्ह्यात ‘डॅमेज कंट्रोल’साठी राष्ट्रवादी नव्या चेहऱ्याच्या शोधात!

By संजय तिपाले | Published: July 4, 2023 12:32 PM2023-07-04T12:32:40+5:302023-07-04T12:33:08+5:30

अतुल गण्यारपवार करणार 'घरवापसी' : धर्मरावबाबांनी तोडले अडीच दशकांपासूनचे नातेे

NCP is looking for a new face for 'damage control' in Gadchiroli district! | गडचिरोली जिल्ह्यात ‘डॅमेज कंट्रोल’साठी राष्ट्रवादी नव्या चेहऱ्याच्या शोधात!

गडचिरोली जिल्ह्यात ‘डॅमेज कंट्रोल’साठी राष्ट्रवादी नव्या चेहऱ्याच्या शोधात!

googlenewsNext

संजय तिपाले

गडचिरोली : मातब्बर आदिवासी नेते धर्मरावबाबा आत्राम यांच्या धक्कातंत्रामुळे जिल्ह्यात पक्षाला मोठा हादरा बसला आहे. ‘डॅमेज कंट्रोल’साठी आता पक्षाने नव्या चेहऱ्याचा शोध सुरू केल्याची माहिती आहे. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व धर्मरावबाबांशी फारकत घेऊन वेगळी चूल मांडणारे सहकार क्षेत्रातील दिग्गज नेते अतुल गण्यारपवार यांच्या घरवापसीची सध्या जोरदार चर्चा आहे.

जिल्ह्यात पक्ष स्थापनेपासून धर्मरावबाबा आत्राम हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. २००४ व २०१९ मध्ये राष्ट्रवादीकडून विधानसभेत गेलेल्या धर्मरावबाबा आत्राम यांना अलीकडे लोकसभेचे वेध लागले होते. काँग्रेसच्या वाट्याला असलेला गडचिरोली- चिमूर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडवून घेण्याची तयारी श्रेष्ठींनी दाखवली होती.

एवढेच नाही तर दीड वर्षापूर्वी देसाईगंज येथे झालेल्या जाहीर सभेत खुद्द शरद पवार यांनी धर्मरावबाबांच्या लोकसभा उमेदवारीबाबत सूचक वक्तव्य करून शिक्कामोर्तब केले होते. मात्र, अडीच दशकांपासून शरद पवार यांच्यासोबतची साथ सोडून धर्मरावबाबा आत्राम यांनी अजित पवार यांच्यासोबत २ जुलै रोजी भाजप-शिवसेना (शिंदे गट) सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

त्यामुळे जिल्ह्यात शरद पवार यांना व पक्षाच्या विचारधारेला मानणाऱ्या कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. ज्या- ज्या जिल्ह्यातील आमदार अजित पवारांसोबत गेले, त्याठिकाणी शरद पवार यांनी ‘डॅमेज कंट्रोल’साठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे.

धर्मरावबाबांना टक्कर देण्यासाठी सक्षम पर्यायाचा विचार सुरू आहे. त्याकरिता धर्मरावबाबांशी मतभेद झाल्याने पक्षाला रामराम ठोकून ‘अकेला चलो रे’ची भूमिका घेणारे अतुल गण्यारपवार यांच्या नावावर राष्ट्रवादीच्या वर्तुळात चर्चा सुरू आहे. धर्मरावबाबांशी मतभेद झाल्याने गण्यारपवार पक्षातून बाहेर पडले होते. आता धर्मरावबाबांनी शरद पवार यांची साथ सोडल्याने ही उणीव भरून काढण्याची संधी गण्यारपवारही सोडणार नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीत ते ‘कमबॅक’ करू शकतात, असे सांगितले जाते.

सहकार क्षेत्रातले बडे प्रस्थ, आर. आर. पाटील यांचे खंदे समर्थक

अतुल गण्यारपवार हे चामोर्शीचे असून सहकार क्षेत्रावर त्यांचा ‘होल्ड’आहे. खरेदी - विक्री संघाचे चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते सभापती असून यापूर्वी मिनी मंत्रालयात सदस्य, सभापतिपदाच्या रूपाने त्यांनी जबाबदारी पेललेली आहे.

राष्ट्रवादीच्या तिकिटावर जिल्हा परिषदेत कृषी व बांधकाम सभापती म्हणून त्यांनी कारकिर्द गाजवलेली आहे. एकेकाळी दिवंगत नेते आर .आर. पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ते परिचित होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे.

जयंत पाटील यांचे आले बोलावणे

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अतुल गण्यारपवार यांना ५ जुलैला मुंबईला शरद पवार यांच्या भेटीसाठी येण्याचे निमंत्रण दिले आहे. माजी मंत्री अनिल देशमुख हे देखील गण्यारपवार यांच्या संपर्कात आहेत.  गण्यारपवारांनी देखील हे निमंत्रण स्वीकारले आहे.

Web Title: NCP is looking for a new face for 'damage control' in Gadchiroli district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.