ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा गजर; ९ ठिकाणी मारली मुसंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 11:34 AM2023-11-08T11:34:02+5:302023-11-08T11:35:02+5:30
कोणाची दिवाळी, कोणाचं दिवाळं : बालेकिल्ल्यात मंत्री धर्मरावबाबांनी राखले गड अबाधित
गडचिराेली : जिल्ह्यात २४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व ३ ग्रामपंचायतीच्या पाेटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमाेजणी ७ नाेव्हेंबर राेजी प्रत्येक तालुका मुख्यालयात झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने घवघवीत यश मिळवून एकूण ९ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील राजकीय ताकद दाखविली.
जिल्ह्यात २४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, तर ३ ग्रामपंचायतींच्या पाेटनिवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला हाेता. थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत रा. काँ. (अजित पवार) ९, भाजपने ५, काँग्रेस ३, राकाँ. (शरद पवार) १, तर अपक्षांनी ६ ग्रामपंचायतींवर सत्ता काबीज केली. येथे त्यांचे सरपंच विराजमान झाले.
भामरागड तालुक्यातील ६ पैकी टेकला, बाेटनफुंडी, पल्ली, एटापल्ली तालुक्यातील जांभिया, नागुलवाही, हालेवारा, अहेरी तालुक्यातील दाेन पैकी राजाराम, काेरची तालुक्यातील दवंडी, सिरोंचा तालुक्यातील एकमेव कोटापल्ली ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने वर्चस्व प्रस्थापित केले. अजित पवार गटाने जिल्ह्यत एकूण नऊ ग्रामपंचायतींवर विजय मिळविला, असा दावा पक्षाने केला, तर धानाेरा तालुक्यातील पन्नेमारा, मुंगनेर, काेरची तालुक्यातील पिटेसूर आदी तीन ग्रा.पं. वर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने वर्चस्व मिळविले. याच तालुक्यातील काेटरा, बाेदालदंड, नवेझरी, सातपुती तसेच भामरागड तालुक्यातील इरकडुम्मे ग्रामपंचायतीवर भाजपने सरपंचपद राखले.
काेरची तालुक्यातील मुरकुटी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ने सरपंचपद राखण्यात यश मिळविले. अहेरी तालुक्याच्या आवलमारी, भामरागड तालुक्यातील मडवेली व आरेवाडा आदी ग्रामपंचायतीवर अजय कंकडालवार यांच्या आविसंचा झेंडा फडकला. येथे त्यांचे सरपंच विराजमान झाले. याशिवाय धानाेरा तालुक्यातील दुर्गापूर व झाडापापडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत गाेंडवाना गाेटूल सेना तर पुस्टाेला ग्रामपंचायतीवर हनपायली ग्रामसभा संघाने यश मिळवून सरपंचपद काबीज करण्यात यश मिळविले. जिल्ह्यात ६ ग्रामपंचायतीवर अपक्षांना आपले सरपंच विराजमान करता आले.
भाग्यश्री आत्राम यांनी लढवली खिंड
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधून (अजित पवार गट) मंत्री धर्मरावबाब आत्राम यांची कन्या व माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी प्रचाराची धुरा एकवटीने सांभाळली. दुर्गम, अतिदुर्गम भागातील उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांनी गावे पिंजून काढली. राष्ट्रवादीने मिळवलेल्या यशात त्यांचा मोलाचा वाटा. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाग्यश्री आत्राम यांना पती व राष्ट्रादीचे नेते ऋतूराज हलगेकर यांना साथ दिली. त्यामुळे धर्मरावबाबा आत्राम यांना बालेकिल्ल्यात ग्रामपंचायतींचा गड शाबूत राखत आला.
तीन ग्रा.पं.ची पोटनिवडणूक
- चामोर्शी तालुक्याच्या दोन ग्रामपंचायतींमध्ये तर अहेरी तालुक्याच्या एका ग्रामपंचायतमध्ये पोटनिवडणूक पार पडली
- चामोर्शी तालुक्यातील येडानूर व नेताजीनगरात पोटनिवडणूक झाली. नेताजीनगरात माधव घरामी हे निवडून आले तर येडानूर येथे कोमल पोटावी ह्या निवडून आल्या. तसेच भाडभिडी, बिलासपूर, मक्केपल्ली चेक नं १ येथील निवडणूकसुद्धा बिनविरोध झाली
- अहेरी तालुक्यातील रेगुलवाही येथे निलिमा नैताम ह्या बिनविरोध निवडून आल्या.
गाव - सरपंचाचे नाव
नागुलवाही : नेवलू गावडे
हालेवारा : नीलिमा गाेटा
जांभिया : गीता हिचामी
पन्नेमारा : शेवंता हलामी
मुंगनेर : सुरजा उसेंडी
दुर्गापूर : परमेश्वर गावडे
झाडापापडा : कांडेराम उसेंडी
पुस्टाेला : बाबुराव मट्टामी
काेटापल्ली : शिवानी आत्राम
टेकला : काजाेल दुर्वा
आरेवाडा : सरिता वाचामी
मडवेली : मलेश तलांडी
इरकडुम्मे : शैला आत्राम
पल्ली : मनाेज पाेरतेट
बाेटनफुंडी : दुलसा मडावी
राजाराम : मंगला आत्राम
व्यंकटापूर : अक्षय पोरतेट
कोटरा : रमेश मडावी
बोदलदंड : पंचशीला बोगा
नवेझरी : सुरेखा आचले
सातपुती : अनिता नुरुटी
दवंडी : रमेश तुलावी
मुरकुटी : रामदेवाल हलामी
पिटेसूर : मीनाक्षी कोडाप