सामान्यांच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादीचा एटापल्लीत हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 11:35 PM2018-03-16T23:35:13+5:302018-03-16T23:35:13+5:30
एटापल्ली तालुक्यातील विविध समस्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी, शेतमजूरांचा मोर्चा शुक्रवारी तहसील कार्यालयावर धडकला.
आॅनलाईन लोकमत
एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील विविध समस्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी, शेतमजूरांचा मोर्चा शुक्रवारी तहसील कार्यालयावर धडकला. राजीव गांधी हायस्कूल ते उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चादरम्यान एटापल्ली येथील वाहतूक काही काळ प्रभावित झाली.
सुरजागड पहाडीवरील खदानींच्या लिजचा निर्णय ग्रामसभेला विश्वासात घेऊन घ्यावा, लोहखनिज प्रकल्पात स्थानिक युवकांनाच रोजगार द्यावा, ३१ मार्चपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम माफ करून त्यांचा सातबारा कोरा करावा, तालुक्यातील गावांमध्ये वीज, पाणी, आरोग्य व शिक्षण आदी सुविधा पुरवाव्या, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार द्यावा, जबरानजोतधारकांना पट्टे देण्यात यावे, अहेरी जिल्हा घोषित करावा आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एटापल्लीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात रायुकाँचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संग्रामसिंग कोते, जिल्हा परिषद बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, ऋतूराज हलगेकर, पं.स. सदस्य हर्षवर्धनराव आत्राम, लिलाधर भरडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, रायुकाँ जिल्हाध्यक्ष रिंकू पापडकर, राकाँ तालुका अध्यक्ष दौलत दहागावकर, पं.स. सभापती बेबीताई लेकामी, राजू नरोटे, संभाजी हिचामी, नगरसेविका सगुणा हिचामी, जिल्हा परिषद सदस्य ग्यानकुमारी कौशीक, ऋषी पोरतेट, पापा पुण्यमूर्तीवार, रामजी कत्रीवार, लक्ष्मण नरोटी, पंकज पुंगाटी, कैलाश कोरेत, लक्ष्मण नरोटी, शंकर करमरकर, मारोती दगाहावकर, केशव कंगाली, हरिदास टेकाम, दीपक यावले, प्रशांत कोपुलवार यांच्यासह तालुक्यातील शेकडो नागरिक उपस्थित होते.
एसडीएम कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर माजी राज्यमंत्री धर्मराव आत्राम यांच्या नेतृत्वात राकाँच्या शिष्टमंडळाने प्रभारी उपविभागीय अधिकारी ए.एस. थेटे यांना मागण्यांचे निवेदन देऊन समस्यांबाबत चर्चा केली. पेसा कायदा धाब्यावर बसवून सुरजागड येथून लोहखनिजाची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी व वाहतूक तसेच खणन बंद करण्याची मागणी केली. यावेळी नायब तहसीलदार एस. एन. सिलमवार, संवर्ग विकास अधिकारी अनिल वाघमारे, वन परिक्षेत्राधिकारी एस. एच. राठोड उपस्थित होते. शासनस्तरावरील मागण्या सोडविण्यासाठी आपण पाठपुरावा करू, असे आश्वासन एसडीओंनी दिले.
स्वत:चा हक्कासाठी सरकार हाणून पाळा
विद्यमान सरकार निव्वळ आश्वासन देण्याचे काम करत असून समोर काय करणार याची कल्पना त्यांनाच नाही. बेरोजगारी वाढली, युवक वर्ग रस्त्यावर उतरत आहेत. महिलांना सुरक्षा नाही, शेतकºयांच्या खात्यात रक्कम नाही मात्र, कर्जमाफी झाल्याची निव्वळ जाहिरातच दाखवितात. सध्या सरकार मध्ये विदर्भाचे नेते मोठमोठ्या पदावर असूनसुद्धा विदर्भाचा विकास नाही. चार वर्षे संपत आले, मात्र यांची आश्वासने अजूनही जशीच्या तशीच आहे. म्हणून या सरकारला आपली जागा दाखविण्याची वेळ आली आहे. सुरजागडसारख्या प्रकल्पाचा मुद्दा कायम असताना खणन सुरू करून कच्चा माल बाहेर घेऊन जात आहे. वास्तविक लोहप्रकल्प याच परिसरात होऊन स्थानिक युवकांना रोजगार मिळायला हवा. त्यासाठी संघर्ष करा, असे आवाहन राकाँचे युवक प्रदेश अध्यक्ष संग्रामसिंग कोते पाटील यांनी मोर्चेकरांना केले.