एटापल्ली पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या बबिता गेडाम यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:42 AM2021-08-21T04:42:00+5:302021-08-21T04:42:00+5:30
आठ सदस्यीय पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे ३, आदिवासी विद्यार्थी संघाचे २, काँग्रेस, भाजप आणि ग्रामसभा यांचे प्रत्येकी एक सदस्य याप्रमाणे ...
आठ सदस्यीय पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे ३, आदिवासी विद्यार्थी संघाचे २, काँग्रेस, भाजप आणि ग्रामसभा यांचे प्रत्येकी एक सदस्य याप्रमाणे संख्याबळ होेते. यापैकी काँग्रेसचे सदस्य सभापती गेडाम यांच्या निधनानंतर सात सदस्य शिल्लक आहेत. सभापतिपद अनुसूचित जमाती प्रवर्गाकरीता राखीव आहे. शुक्रवारी सभापतिपदाकरीता राष्ट्रवादीकडून बबिता मडावी, तर आदिवासी विद्यार्थी संघाकडून संगीता दुर्वा यांनी नामांकन भरले होते. बबिता मडावी यांना ४ मते तर संगीता दुर्वा यांना तीन मते मिळाली. त्यामुळे मडावी एका मताने विजय झाल्या.
यावेळी बांधकाम सभापती युद्धिष्ठीर विश्वास, जि. प. सदस्य भाग्यश्री आत्राम, राकाँचे युवा प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, ज्ञानकुमारी कौशी, तालुका राकाँचे अध्यक्ष दौलत दहागांवकर, महिला राकाँ तालुका अध्यक्ष ललीता मडावी, शहराध्यक्ष पौर्णिमा श्रीरामवार हजर होते.
(बॉक्स)
एका मतासाठी ओढाताण
आविसंने राकाँच्या तीन सदस्यांपैकी एका सदस्याला आपल्याकडे ओढले होते पण तरीही आविसंची खेळी यशस्वी झाली नाही. कारण भाजपचे सदस्य तथा उपसभापती जनार्धन नल्लावार आणि ग्रामसभेच्या शीला गोटा यांची दोन मते मिळविण्यास राकाँला यश मिळाले. पिठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार प्रदीप शेवाळे आणि प्रभारी गटविकास अधिकारी डाॅ. ज्ञानेश्वर गव्हाने यांनी कामकाज सांभाळले. हात उंचावून मतदान प्रक्रिया पार पडली.