कडक बंदोबस्तानंतरही आढळली नक्षली पत्रके व बॅनर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 09:19 PM2018-07-28T21:19:02+5:302018-07-28T21:19:19+5:30
शनिवारपासून (दि.२८) सुरू झालेल्या नक्षल शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
गडचिरोली : जिल्ह्यात शनिवारपासून (दि.२८) सुरू झालेल्या नक्षल शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र तरीही अहेरी तालुक्यात कमलापूर आणि कुरखेडा तालुक्यातील पलसगड येथे नक्षल्यांचे बॅनर, पत्रके आढळून आली. धानोरा, एटापल्ली तालुक्यातही काही ठिकाणी वाहतूक आणि बाजारपेठेवर परिणाम जाणवला.
यावर्षी नक्षल सप्ताह पाळण्यासंदर्भात पलसगड येथील प्रवासी निवा-यावर नक्षली बॅनर आणि लाल झेंडा लावल्याचे सकाळी आढळले. पोलिसांनी जाऊन ते बॅनर व झेंडा काढला. मात्र यामुळे दहशत पसरत शेतीची कामे बंद ठेवण्यात आली. शिवाय दुकानदारांनी आणि खासगी वाहतूकदारांनी बंद पाळला. अहेली तालुक्यात कमलापूर येथे नक्षली पत्रके आढळली. अहेरी एरिया कमिटीच्या वतीने लावलेल्या त्या पत्रकांवर विविध माहिती देऊन बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले.
एटापल्ली-जाराबंडी-गट्टा मार्गावरील वाहतूकही बंद होती. कुरखेडा तालुक्यातील धानोरी, चाराभट्टी, जोशीटोला या गावांत नक्षली दहशतीमुळे रोवणीची कामे बंद होती. धानोरा तालुक्यातील मुरूमगावमध्ये सकाळपासून मार्केट बंद होते. मात्र सकाळी ११ ते १२ वाजताच्या सुमारास पोलिसांनी येऊन दुकाने उघडण्याचे आवाहन केल्यानंतर काही वेळ दुकाने सुरू होती. मात्र पुन्हा दुकाने बंद झाली. कोरची या तालुका मुख्यालयी नक्षली सप्ताह किंवा बंदच्या वेळी दहशतीचे वातावरण असते. मात्र यावेळी ब-यापैकी दुकाने सुरू असल्याचे दिसून आले.
नागरिकांचा शांती मार्च
नागरिकांमधील दहशतीचे वातावरण कमी व्हावे आणि नक्षलींना त्यांचा विरोध असल्याचे दिसून यावे म्हणून पोलिसांच्या पुढाकाराने अनेक ठिकाणी शांती मार्च काढला जात आहे. यात नक्षलविरोधी घोषणा देण्यासोबतच त्यांचा निषेध करणारे फलकही झळकत आहेत.