शरीरासोबत मन टवटवीत ठेवण्यासाठी कलेची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 07:56 PM2019-12-02T19:56:36+5:302019-12-02T19:56:47+5:30
तुम्ही शरीर चांगले आणि तरुण ठेवण्यासाठी अनेक गोष्टी करता, पण त्यासोबत मनाने तरुण, टवटवीत असणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
गडचिरोली : तुम्ही शरीर चांगले आणि तरुण ठेवण्यासाठी अनेक गोष्टी करता, पण त्यासोबत मनाने तरुण, टवटवीत असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हे करण्यासाठी आपल्या अंगातील कलेची उपासना करून त्याचा उपयोग करा, असे आवाहन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे यांनी तरुणांना उद्देशून केले.
येथील गोंडवाना विद्यापीठात १७व्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक कला महोत्सव ‘इंद्रधनुष्य २०१९’चे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर तर अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ. चंद्रशेखर भुसारी, राजभवन निरीक्षण समितीचे डॉ. सुनील पाटील, वित्त प्रबंधन समितीचे अध्यक्ष डॉ. एम. बी. पाटील, विद्यापीठाचे कूलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
राज्यभरातून आलेल्या २० विद्यापीठांच्या संघातील महाविद्यालयीन कलावंत युवक-युवती, प्राध्यापक आणि परीक्षकांच्या उपस्थितीत सोमवारी गोंडवाना महाविद्यालयाच्या प्रांगणात दीप प्रज्वलनाने या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी डॉ. काणे म्हणाले, आयुष्यात उपयोगाच्या सर्वच गोष्टी अभ्यासक्रमात शिकवल्या जात नाही. त्यामुळेच कुलपतींच्या (राज्यपाल) कार्यालयाच्या परवानगीने शरीर, मन आणि बुद्धी यांच्या विकासासाठी अश्वमेध, इंद्रधनुष्य आणि अविष्कार हे अनुक्रमे क्रीडा, कला आणि विज्ञानाला चालना देणारे राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ महोत्सव दरवर्षी आयोजित केले जात आहेत. या महोत्सवातून आपल्याला नवीन उर्जा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या महोत्सवादरम्यान पाच प्रकारच्या कलाप्रकारातील २६ स्पर्धांमध्ये राज्यभरातून आलेले विद्यार्थी कलावंत कलेचे सादरीकरण करणार आहेत. ६ ला या महोत्सवाचा समारोप आणि बक्षीस वितरण होईल.