उच्च शिक्षणाबाबत जनजागृतीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 01:15 AM2018-10-03T01:15:03+5:302018-10-03T01:15:45+5:30
केजीमध्ये प्रवेश घेतलेला विद्यार्थी पीजीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. हे काम महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी करावे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : केजीमध्ये प्रवेश घेतलेला विद्यार्थी पीजीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. हे काम महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी करावे. परिसरातील शाळांमध्ये जाऊन शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी, असे झाल्यास पदवी व पदव्युत्तर विभागाला कधीच विद्यार्थी कमी पडणार नाही. शिक्षणाचे प्रमाण वाढल्याने विकास होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन रसायन तंत्रज्ञान संस्था मुंबईचे कुलगुरू प्रा. डॉ. जी. डी. यादव यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठाच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त २ आॅक्टोबर रोजी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान चातगाव येथील सर्च संस्थेचे संचालक डॉ. अभय बंग यांना गोंडवाना विद्यापीठातर्फे जीवन साधना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ व २५ हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. यादव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर होते. प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ. चंद्रशेखर भुसारी, प्रभारी कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. एन. एस. कोकोडे, डॉ. श्रीराम कावळे, प्राचार्य डॉ. राजू मुनघाटे, अयज लोंढे, डॉ. अनिल चिताडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. यादव म्हणाले, गोंडवाना विद्यापीठामुळे मागास भागाचा विकास होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शासनाने गोंडवाना विद्यापीठाला विशेष दर्जा दिल्यास निधी प्राप्त होण्यास मदत होईल. चांगले प्राध्यापकांना आणण्यासाठी विशेष भत्ते व सोयीसुविधा द्यावे लागतील. याची तयारी विद्यापीठाने ठेवावी. चांगल्या प्राध्यापकांच्या माध्यमातून चांगले विद्यार्थी घडण्यास मदत होईल. संशोधनासाठी विद्यापीठात ग्रंथ व इतर सुविधा निर्माण कराव्यात. शिक्षण घेतानाच विद्यार्थ्यांना एखाद्या कामाचे कौशल्य शिकवावे. त्यामुळे पदवी घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यासमोर बेरोजगारीचे संकट कोसळणार नाही, असे मार्गदर्शन डॉ. यादव यांनी केले.
कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांनी प्रास्ताविकादरम्यान विद्यापीठात कमी सुविधा उपलब्ध आहेत. तरीही विद्यापीठाने विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या सुविधा व शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहे. जागेचा प्रश्न गहण बनला होता. मात्र तो प्रश्न सुटला असून २०० एकर जमीन उपलब्ध होणार आहे. त्यापैकी ३५ एकर जमीन विद्यापीठाच्या नावे सुध्दा झाली आहे.
प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यास शासनाने परवानगी दिली आहे. गोंडवाना विद्यापीठात पद्व्युत्तरचे पाचच विभाग आहेत. अधिक विभाग होण्यासाठी विद्यापीठ प्रयत्न करीत आहे, अशी माहिती दिली.
संचालन प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर यांनी केले. तर आभार कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले यांनी मानले.
यांना मिळाला विद्यापीठाचा पुरस्कार
विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार डॉ. अभय बंग यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर इतरही पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये उत्कृष्ट रासेयो महाविद्यालय पुरस्कार सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर (विद्यापीठस्तरीय), वनश्री महाविद्यालय कोरची (गडचिरोली जिल्हास्तरीय), आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर (जिल्हास्तरीय चंद्रपूर जिल्हा) यांना प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट रासेयो कार्यक्रम अधिकारी म्हणून सरदार पटेल महाविद्यालयाचे प्रा. कुलदीप गौंड, वनश्री महाविद्यालय कोरचीचे प्रा. प्रदीप चापले, आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूरचे प्रा. दिवाकर कुमरे यांना गौरविण्यात आले. उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक पुरस्कार कला, वाणिज्य महाविद्यालय भिसीच्या निकीता प्रल्हाद वरंबे, श्री. जेएसपीएम महाविद्यालय धानोराचे विश्वेश्वरी पुडो यांना प्रदान करण्यात आला.
आंतर महाविद्यालयीन वार्षिकांक स्पर्धा पुरस्कार प्रथम क्रमांक नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय ब्रह्मपुरी, द्वितीय क्रमांक महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी, तृतीय क्रमांक गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय कुरखेडा, उत्तेजनार्थ सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, महिला महाविद्यालय गडचिरोली यांना देण्यात आला. उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार महात्मा गांधी कला, विज्ञान व नसरूद्दीनभाई पंजवानी महाविद्यालय आरमोरी, उत्कृष्ट प्राचार्य म्हणून गोंविदराव वारजुरकर कला वाणिज्य महाविद्यालय नागभिडचे प्राचार्य डॉ. संजय आर. सिंग, उत्कृष्ट शिक्षक म्हणून सरदार पटेल महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विजय वाढई, उत्कृष्ट विद्यापीठ अधिकारी म्हणून उपकुलसचिव डॉ. विजय शिलारे, उत्कृष्ट विद्यापीठ कर्मचारी म्हणून डॉ. सुभाष देशमुख, सुधीर पिंपळशेंडे, संलग्नित महाविद्यालयातील उत्कृष्ट कर्मचारी म्हणून निलकंठराव शिंदे, विज्ञान व कला महाविद्यालय भद्रावतीचे विशाल गौरकार, सरदार पटेल महाविद्यालयाचे अशोक कांबळे, मयुरी चिमुरकर, यांना सन्मानित करण्यात आले.
मागासलेपणाला शक्तीस्थळ बनवा -डॉ. बंग
जीवन साधना गौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतर पुरस्काराला उत्तर देताना डॉ. अभय बंग म्हणाले, मागासल्या भागातील विद्यार्थ्यांना शिकविण्याचे आव्हान गोंडवाना विद्यापीठाला पेलावे लागणार आहे. हे मागासलेपणच शक्तीस्थळ बनविण्याचा प्रयत्न विद्यापीठाने केला पाहिजे. गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती होऊन अवघ्या सात वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. इतर विद्यापीठे अतिशय जुनी आहेत. या विद्यापीठांची नक्कल करून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यास विद्यापीठांच्या रांगेत आपला शेवटचा क्रमांक लागेल. त्यामुळे इतर विद्यापीठांची नक्कल करणे सहजासहजी टाळावे. जंगल, संस्कृती व प्रदुषण हे विषय दिल्लीच्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिकता येणार नाही. या विषयांवर गोंडवाना विद्यापीठाने भर दिल्यास दिल्लीचे विद्यापीठ गोंडवाना विद्यापीठाचा सल्ला घेतील. अनेक विद्यापीठांमधून आपण शिक्षण घेतलो असलो तरी राष्टÑपिता महात्मा गांधी व गडचिरोली जिल्हा हेच आपले मुख्य विद्यापीठ आहेत. येथील नागरिकांकडून खूप सारे शिकायला मिळाले. त्यामुळे येथील नागरिक हेच आपले खरे प्राध्यापक आहेत. ३० वर्षांच्या जन्ममृत्यूचा अभ्यास सुरू आहे. ती आपल्यासाठी प्रयोगशाळा आहे. येथील निसर्ग, नागरिकांनी आपल्याला खूप सारे शिकविले आहे. शिपायासाठी पीएचडीधारक अर्ज करीत असतील तर विद्यापीठाने स्वत:ची गुणवत्ता तपासण्याची गरज आली आहे. एकीकडे बेरोजगार वाढत असतानाच दुसरीकडे कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आपल्याला मिळत नाही, अशी तक्रार कंपन्यांकडून केली जात आहे. दारू व तंबाखुमुक्त गडचिरोली जिल्हा करण्याचा प्रयत्न सर्च संस्थेच्या वतीने केला जात आहे. याला विद्यापीठाने सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. अभय बंग यांनी केले.जीवन साधना गौरव पुरस्कारासोबत दिलेली २५ हजार रूपयांची राशी डॉ. अभय बंग यांनी गोंडवाना विद्यापीठालाच परत केली. या राशीतून गांधी यांच्या विचारधारेवरील पुस्तके खरेदी करावी, असे आवाहन डॉ. अभय बंग यांनी केले.