परसबागेची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:27 AM2021-06-06T04:27:42+5:302021-06-06T04:27:42+5:30
गडचिरोली : जिल्ह्यामध्ये कुपोषणाचे प्रमाण अत्याधिक असल्याने शासनाने त्यावर भाजीपाला व फळरोपांचा उपाय शोधला. आदिवासी कुटुंबांना परसबागेत फळझाडे व ...
गडचिरोली : जिल्ह्यामध्ये कुपोषणाचे प्रमाण अत्याधिक असल्याने शासनाने त्यावर भाजीपाला व फळरोपांचा उपाय शोधला. आदिवासी कुटुंबांना परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीसाठी प्रोत्साहन द्यावे.
रिक्त पदे भरा
काेरची : स्थानिक तहसील कार्यालयात लिपिकवर्गाची अनेक पदे रिक्त आहेत. तहसील कार्यालयाच्या वतीने सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र, पदे रिक्त असल्याने सदर योजना राबविताना अडचण निर्माण होत आहे.
कोरची शहरात फवारणीकडे दुर्लक्ष
कोरची : शहरातील विविध वॉर्डांत अनेक नाले तुंबले असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आजारी लोकांची संख्या वाढत चालली आहे.
टिल्लूपंप जप्तीची मोहीम सुरू करा
आरमाेरी : उन्हाळा असल्याने पाण्यासाठी टिल्लूपंपांचा वापर वाढला आहे. नगर परिषदेतर्फे टिल्लूपंपधारकांवर कारवाई केली जात नसल्याने त्यांची हिंमत वाढत चालली आहे. त्यामुळे टिल्लूपंपांची संख्याही वाढत आहे.
सौरदिवे दुरुस्तीकडे दुर्लक्ष
भामरागड : दुर्गम गावांमध्ये सौरदिव्यांची व्यवस्था शासनाच्या वतीने करण्यात आली. परंतु, या सौरदिव्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष आहे. काही ठिकाणच्या सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीस गेल्या, तर काही ठिकाणी सौरप्लेट लंपास केल्या.
पथदिव्यांअभावी अंधार
गडचिरोली : खरपुंडी मार्गावर डम्पिंग यार्डपर्यंत वीजतारा टाकून खांब गाडण्यात आले आहेत. मात्र, या मार्गावर अजूनपर्यंत पथदिवे लावण्यात आले नाहीत. सकाळी अनेक नागरिक फिरण्यासाठी खरपुंडी मार्गावर जातात. या मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी होत आहे. परंतु, या मागणीकडे पालिकेचे दुर्लक्ष आहे.
वीजचोरी वाढली
गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीजचोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने वीज महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मात्र, वीजचोरीचा भुर्दंड इतर नागरिकांना सहन करावा लागत आहे. दुर्गम व ग्रामीण भागात असा प्रकार चालताे.
मंदिराचा विकास करा
आमगाव (म.) : तालुक्यापासून १० कि.मी. अंतरावर असलेल्या आमगाव (म.) येथील हेमाडपंती मंदिर जीर्ण व दुरवस्थेत आहे. मात्र, याकडे पुरातत्त्व विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. येथे देवालयात ऋषींची मूर्ती, शिवपिंड, नदी, अष्टविनायक, लक्ष्मीनारायण, शिवपार्वती, हत्ती, घोडे, हनुमान मंदिर आहे.
गॅस एजन्सीची गरज
धानोरा : वनविभागामार्फत संयुक्त वनव्यवस्थापनाचे सदस्य व जंगल परिसरातील नागरिकांना अनुदानावर मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. पेंढरी परिसरातील ९० टक्के कुटुंबांकडे गॅस आहे. मात्र, गॅस एजन्सी केवळ धानोरा येथेच आहे. पेंढरी हे परिसरातील मोठे गाव आहे. या गावात गॅस एजन्सी द्यावी.
जंगल उपलब्ध करा
गडचिरोली : काही तालुक्यांमध्ये झुडपी जंगल आहे. सदर जंगल शेतकऱ्यांना शेतजमिनीसाठी उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. वाढत्या लोकसंख्येबरोबरच जमिनीचे तुकडेही वाढत चालले आहेत. कमी जमिनीत यांत्रिकीकरण करणे शक्य होत नाही.
जनावरांमुळे रहदारी बाधित
मुलचेरा : शहरातील मुख्य मार्गांवर मोकाट जनावरे मधोमध उभी राहतात. त्यामुळे रहदारी बाधित होत असून, वाहनधारकांना नेहमी अपघाताची भीती असते. अनेक मार्गांवर मोकाट जनावरांमुळे वाहतूक बाधित होते. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. वारंवार प्रशासनाला सांगूनही झाले, आता माेकाट जनावरांचा बंदाेबस्त करा.
पूल अडवितो मार्ग
कुरखेडा : कुरखेडा-मुरूमगाव मार्गावरील सुरसुंडी-इरूपधोडरी गावांदरम्यान असलेल्या नदीवरील कमी उंचीच्या पुलावरून पावसाचे पाणी वाहत असल्याने दरवर्षीच्या पावसाळ्यात हा मार्ग ठप्प होत असतो. काही नागरिक जीव मुठीत घेऊन पुढचा प्रवास करतात. सुरसुंडी गावाजवळून भेदरी नदी वाहते.
वसातील निवारा जीर्ण
गडचिरोली : आरमोरी मार्गावर असलेल्या गडचिरोली तालुक्यातील वसा येथील प्रवासी निवाऱ्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या प्रवासी निवाऱ्याचे छत वादळामुळे पूर्णत: उडाले. प्रवासी निवाऱ्याला वनस्पतींनी वेढा घातला असून, भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे धोक्याची शक्यता आहे.
भिकारमौशी मार्ग खड्डेमय
गडचिरोली : तालुक्यातील उसेगाव ते भिकारमौशी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून आवागमन करताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सदर मार्गावरून महामंडळाच्या अनेक बसफेऱ्या आहेत. शालेय विद्यार्थी व नागरिक येथून आवागमन करतात.
पशुखाद्य महागले
आलापल्ली : दुभत्या व कष्टाचे काम करणाऱ्या जनावरांना सरकी, ढेप, कडधान्यांचा कोंडा चारले जाते. यामुळे जनावरे सुदृढ राहून दूध जास्त देतात. वाढत्या महागाईचा फटका पशुखाद्यांनाही बसला आहे. किमती १० टक्क्यांनी वाढल्या. त्यामुळे पशुपालक चिंताग्रस्त आहेत. पशुखाद्य महागल्याचा फटका बसत आहे.
कोडसेपल्लीत समस्या
अहेरी : परिसरातील दुर्गम भागात वसलेल्या कोडसेपल्ली येथे अनेक समस्यांची भरमार आहे. गावात नाल्यांचा अभाव असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचण होत आहे. परिणामी, जागोजागी सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. गावातील समस्या साेडविण्याकडे दुर्लक्ष हाेत आहे.
राजोलीचा पूल अर्धवट
धानोरा : तालुक्यातील राजोली गावाजवळच्या कठाणी नदीवर पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल दोन वर्षांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे रपट्यासह वाहून गेला. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांत या गावातील विद्यार्थी व नागरिकांना पुलाअभावी नवरगावमार्गे अधिकचे १५ किमी अंतर कापावे लागते.