व्यसनमुक्त व सुदृढ समाज निर्मितीची आवश्यकता
By admin | Published: November 12, 2014 10:44 PM2014-11-12T22:44:24+5:302014-11-12T22:44:24+5:30
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय तंबाखू निर्मूलन कार्यक्रमांतर्गत गडचिरोली व औरंगाबाद जिल्ह्याची निवड करून तंबाखू मुक्ती कार्यक्रम राबविला जात आहे. शैक्षणिक सत्रात तंबाखू मुक्तीची प्रभावी
गडचिरोली : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय तंबाखू निर्मूलन कार्यक्रमांतर्गत गडचिरोली व औरंगाबाद जिल्ह्याची निवड करून तंबाखू मुक्ती कार्यक्रम राबविला जात आहे. शैक्षणिक सत्रात तंबाखू मुक्तीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सर्वच केंद्र प्रमुखांनी शास्त्रोक्त पद्धतीने माहिती घेऊन तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत आपापल्या केंद्रातील शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी व्यसनमुक्त व सुदृढ समाज निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी केले.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत जिल्ह्यातील केंद्र प्रमुखांचे जीवन कौशल्य, व्यक्तिमत्व विकास व व्यसनमुक्ती प्रशिक्षणाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डायटचे प्राचार्य बी. जी. चौरे होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ अधिव्याख्याता आर. एम. रमतकर, प्राथमिकचे उपशिक्षणाधिकारी कवाडे, सर्चचे व्यसनमुक्ती कार्यक्रम अधिकारी संतोष सावलकर उपस्थित होते.
तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन न करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी, व्यसनमुक्तीमुळे प्रत्येक व्यक्तीचा बौद्धिक, आर्थिक, शारीरिक, मानसिक विकास साधता येतो, असेही संपदा मेहता म्हणाल्या.
व्यसनाच्या दुष्परिणामांबाबत डायटचे प्राचार्य बी. जी. चौरे यांनी विविध उदाहरणांद्वारे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन केंद्र प्रमुख गौतम मेश्राम तर आभार ज्येष्ठ अधिव्याख्याता धनंजय चापले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेतील ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. विनित मत्ते, पवन मानकर, अधिव्याख्याता प्रविणकुमार पाईकराव, प्रभारी अधीक्षक दिनेश बुरबांधे व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी केंद्र प्रमुखांसह कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)