मानवाच्या रक्षणार्थ पर्यावरण संवर्धनाची गरज
By admin | Published: June 6, 2017 12:48 AM2017-06-06T00:48:02+5:302017-06-06T00:48:02+5:30
पर्यावरण व मानवी जीवन यांचा सहसंबंध आहे. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यास मानवी जिवाला धोका होण्याची शक्यता आहे.
जागतिक पर्यावरण दिन : कुरखेडात मान्यवरांचा सूर
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : पर्यावरण व मानवी जीवन यांचा सहसंबंध आहे. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यास मानवी जिवाला धोका होण्याची शक्यता आहे. मानवी जीवनाच्या सुखासाठी पर्यावरणाचे रक्षण होणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे संवर्धन काळाची गरज आहे, असा सूर मान्यवरांनी सोमवारी कुरखेडा वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमात काढला.
कार्यक्रमाचे उद्घाटन आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सहायक वन संरक्षक दीपक चौडीकर होते. प्रमुख अतिथी म्हणून जि. प. चे कृषी सभापती नाना नाकाडे, प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर, जि. प. सदस्य प्रल्हाद कराडे, नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंसी, पं. स. उपसभापती मनोज दुनेदार, पं. स. सदस्य संध्या नैताम, शारदा पोरेटी, विलास गावंडे, गणपत सोनकुसरे, राम लांजेवार, चांगदेव फाये, न. पं. सभापती आशा तुलावी, रवींद्र गोटेफोडे, नगरसेवक अॅड. उमेश वालदे, शाहेदा मुघल, चित्रा गजभिये, राजन खुणे, नारायण टेंभुर्णे, बंडू लांजेवार, सरपंच शशिकला कुमरे, तुलसी उईके, सहायक वनसंरक्षक कैदलवार, सेवानिवृत्त सहायक वन संरक्षक बावनकर उपस्थित होते. सर्वप्रथम वन परिक्षेत्र अधिकारी शंकर गाजलवार व संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष आशा तुलावी यांच्या नेतृत्त्वात शहरातून वृक्षदिंडी काढण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमात वाकडी येथील दारूबंदी करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वन व कर्मचाऱ्यांचाही सत्कार झाला. वृक्षांना कौटुंबिक सदस्याप्रमाणे समजून त्यांचे जतन करावे, असे आवाहन आ. कृष्णा गजबे यांनी केले. अवैैध वृक्षतोडीमुळे वन क्षेत्राचे प्रमाण कमी होत आहे. प्राणी गावाकडे धाव घेत असल्याने जंगलाचे रक्षण करावे, असे आवाहन नाना नाकाडे यांनी केले. डॉ. नरेंद्र आरेकर यांनी वृक्ष लागवड व संवर्धन ही मनुष्याची नैैतिक जबाबदारी आहे. परंतु तो जबाबदारी पार पाडत नसल्याचे दिसून येते, असे सांगितले. यावेळी नगराध्यक्ष मोहबंसी, जि. प. सदस्य कराडे, उपसभापती दुनेदार व सहायक वनसंरक्षक चौडीकर यांनीही मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक वन परिक्षेत्राधिकारी गाजलवार, संचालन वनरक्षक गाजी शेख तर आभार क्षेत्र सहायक भडांगे यांनी मानले. यावेळी वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.