अपघात टाळण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज

By admin | Published: January 10, 2017 12:55 AM2017-01-10T00:55:12+5:302017-01-10T00:55:12+5:30

देशामध्ये दरवर्षी वाढत चालले अपघात लक्षात घेता देशातील प्रत्येक नागरिकाने अपघात टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

The need for everyone's efforts to avoid the accident | अपघात टाळण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज

अपघात टाळण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज

Next

महेश आव्हाड यांचे प्रतिपादन : २८ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा प्रारंभ
गडचिरोली : देशामध्ये दरवर्षी वाढत चालले अपघात लक्षात घेता देशातील प्रत्येक नागरिकाने अपघात टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. सर्वच बाबी प्रशासनावर सोडून चालणार नाही. प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघातांमध्ये घट करणे शक्य आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी केले.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व वाहतूक शाखा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने २८ वा रस्ता सुरक्षा सप्ताह ९ ते २३ जानेवारीदरम्यान राबविला जात आहे. या सप्ताहाचा शुभारंभ ९ जानेवारी रोजी करण्यात आला. यानिमित्त इंदिरा गांधी चौकातील सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन महेश आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक मंजूनाथ सिंगे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शांताराम फासे, मुख्याधिकारी कृष्णा निपाने, जिल्हा परिवहन समिती सदस्य कृष्णा म्हस्के, कार्यकारी अभियंता कुंभार, डॉ. जितेंद्र गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड म्हणाले, जपानमध्ये एक लाख नागरिकांमागे चार व्यक्ती, इंग्लडमध्ये तीन व्यक्ती व भारतात ११ व्यक्तींचा अपघातामध्ये मृत्यू होतो. इतर विकसित देशांच्या तुलनेत भारतात अपघाताचे प्रमाण व त्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्र अपघातांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. पुरोगामी महाराष्ट्राला ही बाब शोभनिय नाही. ७५ टक्के अपघात वाहन चालकाच्या चुकीमुळे, पाच टक्के अपघात दुसऱ्या वाहनचालकांच्या चुकीमुळे तर तीन टक्के अपघात पादचारींमुळे होतात, असे मार्गदर्शन केले.
एसडीपीओ डॉ. सागर कवडे म्हणाले, केवळ पंधरवडा सप्ताह साजरा करून चालणार नाही, तर वाहन चालवितेवेळी आपली जबाबदारी व कर्तव्य याचे भान वाहनचालकांनी ठेवले पाहिजे. वाहन चालविताना मद्यपान टाळावे, वेगाने वाहन चालविल्यास अपघाताची शक्यता वाढते. रात्रीचा प्रवास टाळावा, पावसाळ्यात वेगाने वाहन चालवू नये, अपघात झाल्यानंतर सदर व्यक्तीला तत्काळ रुग्णालयात दाखल करावे, रुग्णालयात दाखल करणाऱ्या व्यक्तीला पोलीस त्रास देणार नाही, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला आलापल्ली आयटीआयचे प्राचार्य सुरेश जोग, विजय काळबांधे, भास्कर मेश्राम, ठाणेदार विजय पुराणिक आदी मान्यवर उपस्थित होते. संचालन अ‍ॅड. कविता मोहोरकर यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: The need for everyone's efforts to avoid the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.