सिरोंचाला जादा बसेसची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 01:30 AM2018-09-23T01:30:50+5:302018-09-23T01:31:13+5:30
तेलंगणा-छत्तीसगड राज्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याने सिरोंचा येथे तेलंगणा राज्यातून येणाऱ्या प्रवासी वाहनांची संख्या वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तेलंगणा-छत्तीसगड राज्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याने सिरोंचा येथे तेलंगणा राज्यातून येणाऱ्या प्रवासी वाहनांची संख्या वाढली आहे. येथे दररोज हजारो प्रवाशी दाखल होत असल्याने त्यांच्या सुविधेसाठी सिरोंचात बस आगार तसेच जादा तसेच आरामदायी बसेसची आवश्यकता निर्माण झाली आहे.
तेलंगणा व छत्तीसगड राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. सदर महामार्ग सिरोंचा तालुक्यातून जाणार आहे. निजामाबाद ते जगदलपूर हा राष्ट्रीय महामार्ग असून या महामार्गावरील इंद्रावती व प्राणहिता नदीवरील पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात पोहोचले आाहे. शिवाय गोदावरी नदीवरील पूल झाल्याने तेलंगणा राज्यातून सिरोंचात शेकडो बसगाड्या येतात. त्यामुळे सिरोंचा येथे बसेस ठेवण्यासाठी जागा उरत नाही. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी तालुक्यात दौरा करून सिरोंचातील हायटेक बसस्थानकाकरिता पाच कोटी रूपये देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे बसस्थानकाचे काम के व्हा सुरू होणार, याची प्रतीक्षा नागरिकांना आहे.
सिरोंचा येथे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व अन्य प्रवाशांची गर्दी राहात असल्याने पासेस व अन्य सुविधांकरिता आगाराची गरज आहे. व्यापाऱ्यांना नागपूर, गडचिरोलीवरून बसने आल्यास प्रवासामुळे बराच त्रास सहन करावा लागतो.
बिघाड आल्यास मन:स्ताप
काही दिवसांपूर्वी गर्कापेठा जंगलात बसमध्ये बिघाड आल्याने तीन ते चार तास प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. सिरोंचा येथे आगार अथवा जादा बसगाड्या असत्या तर प्रवाशांना तत्काळ सेवा उपलब्ध झाली असती. गडचिरोली व अहेरीपर्यंतचे अंतर अतिशय दूर असल्याने अतिरिक्त बस वेळीच पोहोचत नाही. त्यामुळे बस आगाराची निर्मिती करावी, तसेच सिरोंचा ते नागपूर यामार्गे बससेवा सुरू करावी.