शेडनेट हाऊस शेती करण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:28 AM2021-05-30T04:28:32+5:302021-05-30T04:28:32+5:30
काेरची : अधिक फायद्याची व कोणत्याही हंगामात पिके घेऊन शेती समृद्ध करायची असेल, तर शेतकऱ्यांनी शेडनेट हाऊसमध्ये शेती करण्याची ...
काेरची : अधिक फायद्याची व कोणत्याही हंगामात पिके घेऊन शेती समृद्ध करायची असेल, तर शेतकऱ्यांनी शेडनेट हाऊसमध्ये शेती करण्याची गरज आहे. ही शेती नियंत्रित वातावरणात केली जात असल्याने काेणत्याही हंगामात पिके घेता येतात. जिल्ह्यात मुलचेरा तालुक्यात प्रथमच शेडनेट हाऊस हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे. इतरही शेतकऱ्यांनी या शेतीकडे वळण्याची गरज आहे.
कमी उंचीच्या पुलामुळे अडते वाहतूक
चामाेर्शी : तालुक्यातील भेंडाळा परिसरात असलेल्या घारगावजवळील नाल्यावर कमी उंचीचा पूल आहे. हरणघाट, घारगाव, रामाळा, फराडा व मार्कंडादेव या परिसरातील नागरिक या मार्गाने प्रवास करतात. पुलावर संरक्षक भिंत नसल्याने मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात या पुलावरून पाणी वाहते. अशाही स्थितीत नागरिक या पुलावरून प्रवास करतात. संरक्षक भिंत नसल्याने वाहन सरळ नाल्यात काेसळण्याचा धाेका आहे.
चामोर्शीतील नवीन वस्ती बनली समस्याग्रस्त
चामोर्शी : शहरातील गणेशनगर, हनुमाननगर, आष्टीकडे जाणारा मार्ग वस्ती, ऑफिसर कॉलनी, मूल मार्गाच्या उजव्या बाजूची वस्ती साधूबाबानगर आदी वस्त्यांमध्ये गेल्या १० वर्षांपासून लोकसंख्या वाढली आहे; परंतु त्या वस्तीत मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या नाहीत. पक्के रस्ते व नाली व पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेचा अभाव आहे. नालीअभावी सांडपाणी रस्त्यावरून वाहते, त्यामुळे नागरिकांना चिखलातून जा-ये करावी लागते.
भ्रमणध्वनी सेवा वारंवार विस्कळीत
सिरोंचा : तालुक्यातील आसरअल्ली परिसरात सात ते आठ गावांचा समावेश आहे; परंतु या भागातील बीएसएनएल कव्हरेज व इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. अंकिसा परिसरात लक्ष्मीदेवी पेठा, बालमुत्त्यमपल्ली, कंबालपेठा, राघवरावनगर, जंगलपल्ली, गेर्रेपल्लीश आदी गावे येतात; परंतु मागील एक महिन्यापासून येथील बीएसएनएल सेवा विस्कळीत होत आहे. विद्युत पुरवठाही खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दूरसंचार विभागाचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप ग्राहकांकडून होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन नियमित सेवा द्यावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.
लाेहा गावाला विजेची प्रतीक्षा
झिंगानूर : लोहा गावाचा समावेश अहेरी तालुक्यात आहे, तर येडसिली गाव सिरोंचा तालुक्यात येते. दोन्ही गावे झिंगानूर परिसरात आहेत; परंतु या गावांमध्ये सोयी-सुविधांचा अभाव आहे. स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतरही गावाच्या विकासाला गती मिळाली नाही. लोहा गावात १०० टक्के आदिवासी समाज आहे; परंतु येथे अद्यापही वीज पोहोचली नाही. गावातील नागरिकांना नियमित आरोग्यसेवा मिळत नाही. गावातील नागरिक शिक्षणापासून वंचित असल्याचे दिसून येते. येथे पक्के रस्ते, नाल्या व पिण्याच्या पाण्याच्या सोयीचा अभाव आहे.
गोडलवाही-पेंढरी मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी
धानोरा : तालुक्यातील गोडलवाही, महागाव, पेंढरी मार्गावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले असून, अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धक्के खावे लागत आहेत. महामंडळाची बसही या मार्गावरून कशीबशी धावत आहे. सातत्याने मागणी करूनही या मार्गाची सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती केली नाही. या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.