शेडनेट हाऊस शेती करण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:25 AM2021-06-25T04:25:56+5:302021-06-25T04:25:56+5:30
काेरची : अधिक फायद्याची व कोणत्याही हंगामात पिके घेऊन शेती समृद्ध करायची असेल, तर शेतकऱ्यांनी शेडनेट हाऊसमध्ये शेती करण्याची ...
काेरची : अधिक फायद्याची व कोणत्याही हंगामात पिके घेऊन शेती समृद्ध करायची असेल, तर शेतकऱ्यांनी शेडनेट हाऊसमध्ये शेती करण्याची गरज आहे. ही शेती नियंत्रित वातावरणात केली जात असल्याने काेणत्याही हंगामात पिके घेता येतात. जिल्ह्यात मुलचेरा तालुक्यात प्रथमच शेडनेट हाऊस हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे. इतरही शेतकऱ्यांनी या शेतीकडे वळण्याची गरज आहे.
कमी उंचीच्या पुलामुळे अडते वाहतूक
चामाेर्शी : तालुक्यातील भेंडाळा परिसरात असलेल्या घारगावजवळील नाल्यावर कमी उंचीचा पूल आहे. हरणघाट, घारगाव, रामाळा, फराडा व मार्कंडादेव या परिसरातील नागरिक या मार्गाने प्रवास करतात. पुलावर संरक्षक भिंत नसल्याने मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात या पुलावरून पाणी वाहते. अशाही स्थितीत नागरिक या पुलावरून प्रवास करतात. संरक्षक भिंत नसल्याने वाहन सरळ नाल्यात काेसळण्याचा धाेका आहे.
चामोर्शीतील नवीन वस्ती समस्याग्रस्त
चामोर्शी : शहरातील गणेशनगर, हनुमाननगर, आष्टीकडे जाणारा मार्ग वस्ती, ऑफिसर कॉलनी, मूल मार्गाच्या उजव्या बाजूची वस्ती साधूबाबानगर, आदी वस्त्यांमध्ये गेल्या दहा वर्षांपासून लोकसंख्या वाढली आहे; परंतु त्या वस्तीत मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या नाहीत. पक्के रस्ते, नाली व पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेचा अभाव आहे.
भ्रमणध्वनी सेवा वारंवार विस्कळीत
सिरोंचा : तालुक्यातील आसरअल्ली परिसरात सात ते आठ गावांचा समावेश आहे; परंतु या भागातील बीएसएनएल कव्हरेज व इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. याकडे बीएसएनएलने लक्ष देण्याची गरज आहे.
दुरुस्तीअभावी तलावांची दुरवस्था
चामाेर्शी : जिल्ह्यातील सिंचनाचे प्रमाण अतिशय कमी आहे. अनेक वर्षांपासून मालगुजारी तलावांची दुरुस्ती केली जात नाही. परिणामी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावरच शेती करावी लागत आहे. सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेला मामा तलाव नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील तलावांची दुरुस्ती करावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे. यासाठी वरिष्ठांनी लक्ष द्यावे.
कलेक्टर कॉलनीत सांडपाण्याची दुर्गंधी
गडचिरोली : शासकीय कर्मचाऱ्यांची वसाहत समजल्या जाणाऱ्या कॉम्प्लेक्स परिसरातील कलेक्टर कॉलनीतील ड्रेनेजलाइन फुटली आहे. त्यामुळे सांडपाण्याची दुर्गंधी येत आहे. सातत्याने मागणी करूनही पालिका प्रशासनाचे समस्यांकडे दुर्लक्ष आहे.
येवली येथे जलद बसचा थांबा द्या
गडचिरोली : येथून जवळच असलेल्या येवली येथे जलद बसथांबा आहे. मात्र, गडचिरोली आगाराच्या बसगाड्यांव्यतिरिक्त इतर आगाराच्या जलद बसगाड्या येथे थांबत नाहीत. त्यामुळे नागरिकांना गडचिरोली आगारात बसगाडी बदलावी लागत आहे. त्यामुळे येथे जलद बसथांबा देण्याची मागणी होत आहे.
लोंबकळणाऱ्या तारांमुळे वाढला धोका
धानोरा : तालुक्याच्या दुर्गम भागात विजेच्या तारा लोंबकळत आहेत. काही ठिकाणी विद्युत खांब कललेले आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी वीज विभागाकडे तक्रारही केली आहे. मात्र, वीज वितरण कंपनीचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
सट्टापट्टीसाठी इंटरनेटचा वापर वाढला
कुरखेडा : तालुक्यासह जिल्हाभरातील शहरी भागात सट्टापट्टीचे नंबर पाहण्यासाठी मोबाईलद्वारे इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे. अनेक लोक भ्रमणध्वनीवर इंटरनेटद्वारे सट्टापट्टीचे नंबर शोधताना दिसून येतात. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
गोगाव-पिपरटोला मार्गाची दुरुस्ती करा
गडचिरोली : तालुक्यातील गोगाव-पिपरटोला या मार्गाची अनेक दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
आलापल्ली येथे गतिरोधक निर्माण करा
आलापल्ली : येथील नागमाता मंदिरात भाविकांची गर्दी दर्शनासाठी दिवसेंदिवस वाढत आहे; परंतु या मार्गाने भरधाव वाहनांचे आवागमन असते. येथे गतिरोधक उभारावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गावरून दुचाकी, चारचाकी वाहनांसह अवजड वाहनांचेही आवागमन असते.
सीमावर्ती भागात गुटखा विक्री सुरूच
अहेरी : जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात गुटखा विक्री सुरूच असल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगड, आंध्रप्रदेश या राज्यातून अवैध गुटखा विक्रीस आणल्या जात आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
आलापल्ली येथे बंधाऱ्याचे बांधकाम करा
आलापल्ली : परिसरातील गावांमध्ये कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम करावे, अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे. गावात अल्प हातपंप सुरू असल्याने येथे नव्याने हातपंपही निर्माण करावे, अशी मागणी आहे. या भागात सिंचन सुविधा ताेकड्या असल्याने याचा परिणाम दाेन्ही हंगामातील विविध पिकांवर हाेत आहे.
प्रभारी लाईनमनमुळे नागरिकांना त्रास
अहेरी : जिल्ह्यातील बहुतांश गावात लाइनमनकडे अनेक गावांचा पदभार आहे. आता हिवाळा सुरू असला तरी दिवसामागे वीज जाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वीज सुरळीत करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रत्येक गावांसाठी लाइनमन द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
स्वयंरोजगारासाठी निधी उपलब्ध करावा
कुरखेडा : शासनातील विविध विभागांमध्ये नोकर भरतीवर बंदी घातली आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. अनेक युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला. कोरोनामुळे राज्य सरकारने निधीत मोठी कपात केली. त्यामुळे तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांची अडचण वाढली आहे.