एसटीतल्या प्रथमोपचार पेट्यांवरच उपचाराची गरज; एसटीत फर्स्ट एड असणे आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 03:17 PM2024-09-14T15:17:02+5:302024-09-14T15:19:32+5:30

आज जागतिक प्रथमोपचार दिन: पेट्यांमधील कीट आता वाहकाकडे

Need for treatment only on first aid kits in ST; Must have first aid in ST | एसटीतल्या प्रथमोपचार पेट्यांवरच उपचाराची गरज; एसटीत फर्स्ट एड असणे आवश्यक

Must have first aid in ST bus

दिगांबर जवादे 
लोकमत न्यूज नेटवर्क 
गडचिरोली :
एसटीत असलेल्या पेटीत ठेवलेली प्रथमोपचाराची किट काही दिवसांतच गायब होत असल्याचा अनुभव लक्षात घेऊन सदर किट वाहकाकडे ठेवण्याचे निर्देश एसटी महामंडळाने दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक वाहकाकडे किट देण्यात आली आहे. मात्र, कर्तव्यावर जातेवेळी बहुतांश वाहक सोबत खरेच किट नेतात काय, हा प्रश्न आहे. अपघातानंतर प्रथमोपचाराचे विशेष महत्त्व असल्याने प्रथमोपचाराचे साहित्य एसटीत असणे आवश्यक आहे.


अपघातात जखमीला दवाखान्यात भरती करण्यापूर्वी जो उपचार केला जातो त्याला प्रथमोपचार असे म्हणतात. उपचाराएवढेच प्रथमोपचाराचेही महत्त्व आहे. रुग्णाला दवाखान्यात भरती करून त्याला उपचार मिळेपर्यंत दिलासा देण्याचे काम प्रथमोपचार करते. प्रत्येक आरोग्याच्या समस्येचे प्रथमोपचार वेगवेगळे आहेत. एसटीने प्रामुख्याने अपघात होण्याची शक्यता असल्याने अपघाताशी संबंधित प्रथमोपचार किट ठेवणे सक्तीचे आहे. 


पेट्या रिकाम्या, वाहकाकडे साहित्य 
गडचिरोली आगारातील सर्वच बसला प्रथमोपचार पेट्या लावण्यात आल्या आहेत. या पेट्या चालकाच्या केबिनमध्ये लावल्या आहेत. मात्र, पेट्यांमधील प्रथमोपचाराचे साहित्य गायब होत असल्याचे लक्षात आल्यानंतर आता प्रथमोपचाराच्या किट वाहकांकडे दिल्या आहेत.


तपासणी पथकाने कीटही तपासावे 
प्रत्येक विभागात एसटीचे भरारी पथक असते. सदर पथक प्रवाशांनी तिकीट काढले की, नाही, हे तपासत असते. तिकीट आढळून न आल्यास जबाबदार असलेल्या प्रवासी किंवा वाहकावर कारवाई करते. वाहकाने सोबत प्रथमोपचार किट आणली काय? हे तपासावे.


"प्रत्येक आजारानुसार प्रथमोपचार वेगवेगळे आहेत. सर्वसाधारणपणे होणाऱ्या आजाराच्या प्रथमोपचाराची थोडीफार माहिती प्रत्येक व्यक्तीला असावी. जेणेकरून रुग्णाला दवाखान्यात भरती करून त्याच्यावर उपचार सुरू होईपर्यंत त्याला दिलासा मिळेल. अन्यथा प्रकृती अधिक बिघडण्याची शक्यता असते." 
- डॉ. प्रशांत कारेकर, फिजिशियन


"एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या निर्देशानुसार प्रथमोपचाराची किट वाहकाकडे देण्यात आली आहे. कर्तव्यावर जातेवेळी वाहकाने सोबत प्रथमोपचाराची किट नेणे आवश्यक आहे. साहित्य संपल्यानंतर किवा त्यांची एक्सपायरी संपल्यानंतर विभागीय कार्यालयातून पुन्हा साहित्य उपलब्ध होते."
- फाल्गुन राखडे, आगार व्यवस्थापक

Web Title: Need for treatment only on first aid kits in ST; Must have first aid in ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.