भूजल पातळी वाढविण्यासाठी नियाेजन, जतन व संवर्धनाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:25 AM2021-06-11T04:25:23+5:302021-06-11T04:25:23+5:30
महात्मा गांधी महाविद्यालयात ‘जलशक्ती अभियान २०२१- कॅच द रेन’ या विषयावर विद्यापीठस्तरीय ई-कार्यशाळा ७ जूनला प्राचार्य डाॅ. लालसिंग खालसा ...
महात्मा गांधी महाविद्यालयात ‘जलशक्ती अभियान २०२१- कॅच द रेन’ या विषयावर विद्यापीठस्तरीय ई-कार्यशाळा
७ जूनला प्राचार्य डाॅ. लालसिंग खालसा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या कार्यशाळेत साधनव्यक्ती म्हणून राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज विद्यापीठ नागपूरचे भूजलशास्त्रज्ञ प्रा. डॉ. वाय. ए. मुरकुटे, भूजल सर्वेक्षण विकास आणि यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक टी. पी. सयाम उपस्थित होते. प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेची भूमिका मांडताना कर्तव्य भावनेतून शक्य ती साधने वापरून सातत्याने विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून जनतेला जागृत व सावध करीत असल्याचे सांगितले. याप्रसंगी भारतीय युवा कल्याण संस्थेचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक मनोहर हेपट यांनी अभिप्राय नोंदविला. आभासी कार्यशाळेत ३०० वर संशोधक, विद्यार्थी, प्राध्यापक यांनी झूम व यूट्युबवर सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रियदर्शन गणवीर, तज्ज्ञ मार्गदर्शकांचा परिचय उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत डोर्लीकर यांनी दिला, तर आभार भूगोल विभागाचे प्रा. पराग मेश्राम यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ. विजय गोरडे, डॉ. किशोर वासुर्के, डॉ. सतीश कोला, प्रा. सुनील चुटे, प्रशांत दडमल यांनी सहकार्य केले.
बाॅक्स
भूगर्भातील स्थिती व पाणीटंचाईवर मार्गदर्शन
बीजभाषणातून प्रा. डॉ. वाय. ए. मुरकुटे यांनी भारतातील जलव्यवस्थापनाविषयी माहिती देताना जलचक्र, पृथ्वीवरील असलेल्या गोड्या पाण्याचे प्रमाण, भारतातील पाण्याचे साठे व भविष्यात होणारी पाणीटंचाईवर मात कशी करता येईल याविषयी माहिती दिली. याप्रसंगी त्यांनी प्राचीन कालखंडातील वेदातील ऐतिहासिक पुरावे देऊन पाण्याचे असलेले महत्त्व विशद केले. तसेच भारतातील विविध प्रदेशांतील पाणी साठवणूक आणि वापरण्याच्या पद्धतीची माहिती देत प्रत्येकाने पाण्याचे महत्त्व जाणून घेत भविष्यात पाण्याचा योग्य व नियोजित वापर करण्याबद्दल सांगितले. यावेळी टी. पी. सयाम यांनी गडचिरोली जिल्ह्यातील भूगर्भातील जलशक्तीची स्थिती, गावातील भूगर्भिक जलाच्या सर्वेक्षणाबद्दल, तसेच विहिरीबद्दल भूगर्भिक जलजन्य खडक याबाबत मार्गदर्शन केले.