गुणवत्तेसाठी दर्जेदार शैक्षणिक साहित्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 06:00 AM2019-12-01T06:00:00+5:302019-12-01T06:00:26+5:30
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या वतीने आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत ३० नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय शिक्षणवारीचे आयोजन डीआयईसीपीडीच्या प्रांगणात करण्यात आले. या शिक्षणारीचे उद्घाटन डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये गुणवत्ता आहे. या गुणवत्तेला चालना देण्याची गरज आहे. गुणवत्तापूर्ण अध्यापन होण्यासाठी शिक्षकांनी आग्रही असले पाहिजे. त्यासाठी विविध शैक्षणिक साहित्यांचा वापर केला पाहिजे. येथील शिक्षकांनी तयार केलेले शैक्षणिक साहित्य व अवलंबलेली अध्यापन पध्दती राज्यातील इतर जिल्ह्यांना मार्गदर्शक ठरेल असे प्रयत्न करावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या वतीने आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत ३० नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय शिक्षणवारीचे आयोजन डीआयईसीपीडीच्या प्रांगणात करण्यात आले. या शिक्षणारीचे उद्घाटन डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून डीआयईसीपीडीचे प्राचार्य शरदचंद्र पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजकुमार निकम, प्राथमिक शिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. विनित मत्ते, संभाजी भोजने आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद शिक्षणासाठी निधी कमी पडू देणार नाही. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल व शिकविलेले विद्यार्थ्यांना लक्षात येईल, यासाठी जास्तीत जास्त शैक्षणिक साहित्यांचा वापर करावा, असे आवाहन केले. प्रास्ताविक प्राचार्य शरदचंद्र पाटील, संचालन अधिव्याख्याता पुनित मातकर तर आभार वैशाली एगलोपवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी डीआयईसीपीडीचे कर्मचारी, जिल्हाभरातील गटसाधन व्यक्ती, शिक्षक यांनी सहकार्य केले.
नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य
एखाद्या शिक्षकाने तयार केलेले नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य इतरही शिक्षकांना माहित व्हावे, या उद्देशाने सर्वप्रथम तालुकास्तरावर शैक्षणिक वारीचे आयोजन करण्यात आले होते. तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकाविलेल्या शिक्षकांना जिल्हास्तरीय शिक्षणवारीत सहभागी होण्याची संधी देण्यात आली होती. जिल्हास्तरीय शिक्षणवारीत भाषा, गणित, इंग्रजी, सामाजिकशास्त्र, विज्ञान, माहिती तंत्रज्ञान या सहा विषयांचे प्रत्येकी ११ असे एकूण ६६ शैक्षणिक साहित्य ठेवण्यात आले होते. भामरागड तालुका सहभागी झाला नव्हता.